प्रभात फेरीतून जनजागृतीचा संदेश; वृक्षारोपण व ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धेने अभियानाला मिळाली प्रेरणादायी दिशा

करमाळा प्रतिनिधी

केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानास’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. १ येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ करण्यात आला.

अभियानाच्या प्रारंभानिमित्त शाळेतील, अंगणवाडीतील विद्यार्थी, सेविका, मदतनीस व शिक्षकांनी गावातून प्रभात फेरी काढली. विविध जनजागृतीपर घोषणा देत सेवा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि नागरिकांच्या कर्तव्यांविषयी, राष्ट्रीय एकात्मता याबाबत जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात अभियानाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

यानंतर शा. व्य. स.चे अध्यक्ष नितीन कोकरे यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत ‘सेवा’ ही केवळ संकल्पना न राहता ती कृतीत उतरविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि राष्ट्रनिर्मितीच्या कल्पनांना चालना देण्यासाठी ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीतून विकसित, स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक व प्रगत भारताचे चित्र आपल्या कुंचल्यातून साकारण्याचा प्रयत्न केला.

प्रभात फेरीतून जनजागृती, वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन आणि चित्रकलेतून विकसित भारताचे स्वप्न अशा त्रिसूत्री उपक्रमातून खातगाव नं. १ शाळेने ‘सेवा संकल्प अभियानाची’ दमदार सुरुवात केली. या अभियानाच्या संपूर्ण कालावधीतही विविध जनजागृतीपर व समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे व बिभिषण सातपुते यांनी व्यक्त केला.

सेवा संकल्प अभियानाच्या या उत्स्फूर्त प्रारंभाबद्दल गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके, शि.वि.अ. नितीन कदम, मिनीनाथ टकले, जयवंत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी बाळासाहेब बोडखे व बिभिषण सातपुते यांचे विशेष कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *