
करमाळा प्रतिनिधी
श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेल्या मोफत भात-भाजी वाटप उपक्रमास करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, कुर्डुवाडी भाजपाचे सुधीर गाडेकर आदीजण उपस्थित होते.
यावेळी माने यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेतले. तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा, कोणताही विद्यार्थी उपाशीपोटी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने सुरू झालेला हा उपक्रम आज १५ वर्षांचा प्रवास पूर्ण करत आहे. या कालावधीत हजारो विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च शिक्षण घेऊन यशस्वी झाले आहेत. अनेक जण अधिकारी, शिक्षक, अभियंते तसेच विविध जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत.
प्रवासादरम्यान किंवा विविध कार्यक्रमांमध्ये जेव्हा एखादा अधिकारी, कर्मचारी किंवा यशस्वी व्यक्ती भेटून अभिमानाने सांगते, “भाऊ, आम्ही तुमची भात-भाजी खाल्ली आहे,” तेव्हा या उपक्रमामागील सर्व परिश्रमांचे सार्थक झाल्याची भावना मनाला स्पर्शून जाते.
हा उपक्रम केवळ अन्नदानाचा नसून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, हितचिंतक आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच ही सेवा अखंडपणे सुरू आहे. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते