वाईट प्रथा-परंपरा व दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण अंगीकारण्याचा विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प

करमाळा प्रतिनिधी
दहीहंडी हा सण केवळ उत्सव म्हणून साजरा न करता त्यातून विद्यार्थ्यांना सामाजिक व नैतिक मूल्यांचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. १ येथे अभिनव पद्धतीने ‘संस्कारमय दहीहंडी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि शिक्षक बिभिषण सातपुते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी अज्ञान, वाईट प्रथा-परंपरा, चुकीचे विचार, आळशीपणा, अस्वच्छता, भेदभाव, खोटेपणा, व्यसनाधीनता अशा दुर्गुणांची हंडी फोडण्याचा प्रतीकात्मक संदेश दिला. त्याचबरोबर सत्य, प्रामाणिकपणा, स्वच्छता, शिस्त, सहकार्य, बंधुभाव, परोपकार, पर्यावरणप्रेम, सकारात्मक विचार, कष्ट आणि एकता या सद्गुणांचा स्वीकार करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.

दहीहंडीच्या पारंपरिक उत्साहाला संस्कार शिक्षणाची जोड देत ‘हंडी फोडायची ती केवळ माठाची नाही, तर आपल्या मनातील वाईट विचारांची आणि दुर्गुणांची!’ असा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एकमेकांना सहकार्य, संघभावना आणि एकीचे महत्त्व अनुभवले. चांगले विचार, चांगल्या सवयी आणि चांगले आचरण यांमधूनच जबाबदार व आदर्श नागरिक घडतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
उपक्रमाच्या माध्यमातून सण-उत्सव हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता मूल्यशिक्षण, सामाजिक जाणीव आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन ठरू शकतात, हे विद्यार्थ्यांनी कृतीतून दाखवून दिले. विशेष म्हणजे याप्रसंगी गावातील महिलांची आणि पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
या अभिनव उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी रिंकल हाडके, शि.वि.अ. नितीन कदम, मिनीनाथ टकले, जयवंत नलावडे, केंद्रप्रमुख महावीर गोरे, सर्व पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडून बाळासाहेब बोडखे आणि बिभिषण सातपुते यांचे कौतुक करण्यात आले.