करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्याची आढावा बैठक सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत टेंभुर्णी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिमचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी काळातील पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, बूथ सक्षमीकरण, पदवीधर मतदार नोंदणी, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार आणि स्थानिक विकासकामांचा आढावा यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्य व केंद्र सरकारने राबविलेल्या विविध जनहिताच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले. “भारतीय जनता पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे. विकासकामांसाठी निधीची आवश्यकता असेल तर मी कुठेही कमी पडू देणार नाही. मात्र प्रत्येक पदाधिकाऱ्याने संघटन वाढीसाठी, पक्ष विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि शासनाच्या योजना घराघरात नेण्यासाठी जबाबदारीने काम केले पाहिजे असे सांगितले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना संघटनात्मक विस्तारावर विशेष भर दिला. “गाव तिथे शाखा, बूथ तिथे भाजपा” या संकल्पनेला गती देत प्रत्येक गावात आणि प्रत्येक बूथवर पक्षाचे संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले. आगामी काळात पक्षाच्या विविध अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करून भाजपाची विचारधारा अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

भाजपा सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेली ही पहिलीच अधिकृत संघटनात्मक आढावा बैठक असल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राम सातपुते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, चेतनसिंह केदार तसेच उपस्थित मान्यवरांनी गणेश चिवटे यांचा सत्कार करून अभिनंदन केले व आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसमावेशक करण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाच्या प्रत्येक अभियानात कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढवून जिल्ह्यात भाजपाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरजाताई बोबडे तसेच सर्व मंडळ अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *