
करमाळा प्रतिनिधी
वाशिंबे रेल्वे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर करण्यात आला असून, २८ ऑगस्ट २०२६ पासून हा थांबा सुरू होणार आहे. त्यामुळे वाशिंबे व परिसरातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण झाली असून, प्रवासाची सुविधा अधिक सुलभ होणार आहे.

या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारे सुयोग झोळ यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. प्रवासी सेवा संघ, लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे झोळ यांनी सांगितले.
या पाठपुराव्यात प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. ओमराजे निंबाळकर, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते दिग्विजय बागल, नगरसेवक दीपक चव्हाण, संचालक गणेश झोळ, भाजप अध्यक्ष सचिन पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमरजीत साळुंके, जेऊर प्रवासी असोसिएशनचे सुहास सूर्यवंशी तसेच प्रदीप पवार यांचे सहकार्य लाभले. तसेच सोगाव, वाशिंबे, मांजरगाव, गोयेगाव, उंदरगाव आणि राजुरी येथील ग्रामपंचायती, अभिनव माध्यमिक विद्यालय, शरदचंद्रजी पवार विद्यालय, राजेश्वर विद्यालय आणि पत्रकार संघाचेही या मागणीसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले.
शेकडो निवेदने, ई-मेल, दूरध्वनीद्वारे पाठपुरावा, रेल्वे अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तसेच वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे या मागणीला सातत्याने बळ मिळाले. अखेर रेल्वे बोर्डाने वाशिंबे स्टेशनवर दौंड–कलबुर्गी शटलला प्रवासी थांबा मंजूर केला. २८ ऑगस्टपासून प्रवाशांना या थांब्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
……………
“ही मागणी केवळ कागदावर मांडून आम्ही थांबलो नाही, तर गेली दोन वर्षे प्रत्येक स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेक अडचणी आल्या, निराशाही वाटली; मात्र प्रयत्न थांबवले नाहीत. प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांचा या निर्णयामध्ये सिंहाचा वाटा आहे. परिसरातील ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांच्या सहकार्यामुळे हा निर्णय शक्य झाला. आता सकाळच्या सत्रात पुण्याच्या दिशेनेही थांबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्याबाबतही सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.” — सुयोग झोळ, वाशिंबे (ता. करमाळा)