‘जुग जुग जिओ’ अभियानातून अवयवदानाचा संदेश
नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयात अवयवदान पंधरवड्याचा उत्साहात प्रारंभ
करमाळा : “अवयवदान हे महादान असून, एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेकांना नवजीवन मिळू शकते,” या मानवतावादी संदेशातून ‘जुग जुग जिओ’ अभियानांतर्गत अवयवदान पंधरवडा ३ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचा प्रारंभ नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय, करमाळा येथे जनजागृतीपर कार्यक्रमाने करण्यात आला.
यावेळी अवयवदानाचे महत्त्व, अवयवदानाबाबत असलेले गैरसमज, अवयवदानाची प्रक्रिया तसेच मृत्यूनंतर अवयवदान करून गरजू रुग्णांना जीवनदान कसे देता येते, याबाबत उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वेदपाठक मॅडम यांनी उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. वेदपाठक मॅडम तसेच उपजिल्हा रुग्णालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे स्वागत प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी केले. यावेळी त्यांनी अवयवदानासारख्या सामाजिक आणि मानवतावादी उपक्रमांची जनजागृती शैक्षणिक संस्थांमधून होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थ्यांना अवयवदानाची शपथ देण्यात आली. अवयवदानाबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करून अधिकाधिक नागरिकांनी या महान कार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास नामदेव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक बाळासाहेब नरारे, जाकीर शेख, जवंजाळ सर, तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सुहास आगलावे, परिचारिका श्रीमती छाया शिंदे, समुपदेशक श्री. विकास लिंगराज यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी, विद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपले मनोगत व्यक्त करून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः अवयवदानाबाबत माहिती घेऊन ती आपल्या कुटुंबीयांपर्यंत व समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कपिल भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब नरारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जाकीर शेख यांनी मानले.
अवयवदानाविषयी समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘अवयवदान करा, जीवनदान द्या’ या संदेशातून मानवतेची ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *