
करमाळा प्रतिनिधी
राज्य सरकारच्या वतीने बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याबरोबरच विवाह तसेच संसारोपयोगी साहित्याच्या तरतुदींचाही समावेश आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे.

मात्र, सोलापूर जिल्ह्यात या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती बंद झाली. या घटनेला सुमारे एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असून नवीन अधिकारी नियुक्त झाले आहेत. तरीदेखील पात्र विद्यार्थ्यांचे दाखल प्रकरणे व कागदपत्रांची तपासणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याने विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

शिष्यवृत्तीअभावी अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, काहींना शिक्षण सोडून मिळेल ते काम करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे बालमजुरी वाढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस हनुमंत मांढरे-पाटील यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार व त्यांच्या पाल्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. त्यांनी यासंदर्भात मंत्र्यांना निवेदन देऊन बंद असलेली बांधकाम कामगार विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
यावेळी मंत्री आकाश फुंडकर यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून एका महिन्याच्या आत शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती हनुमंत मांढरे-पाटील यांनी दिली.