करमाळा प्रतिनिधी

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना कशाप्रकारे भाडेतत्वार देणार आहात ? हे आधी दोघांनीही (घेणार आणि देणार) एकत्र येऊन स्पष्ट करावे, या मागणीसह आदिनाथ कारखान्याच्या विविध प्रश्नासाठी उदयसिंह देशमुख यांनी उपोषण सुरु केले आहे.

आमदार नारायण पाटील हे अध्यक्ष असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना दहा वर्षासाठी भाडेतत्वार देण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजणांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच आता देशमुख यांनी या कारखान्यासाठी उपोषण सुरु केले आहे. देशमुख यांनी म्हटले आहे की, ‘श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना कशाप्रकारे भाडेतत्वार देणार आहात ? हे आधी दोघांनीही (घेणार आणि देणार) एकत्र येऊन स्पष्ट करावे. हा कारखाना सुरु झाला पाहिजे. सध्याचे संचालक मंडळ सभासदांचा विश्वास जिंकून सत्तेत आले आहे. हा कारखाना सहकारीच राहिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. मात्र आता हा कारखाना भाडेतत्वावर देण्याची चर्चा सुरु झाली आहे. भाडेतत्वावर घेणारा आणि देणारा यांच्याशिवाय इतर सभासदांना याबाबत काहीही अधिकृत माहिती नाही. त्यामुळे भाडेतत्वावर हा कारखाना कसा दिला जाणार आहे हे आधी स्पष्ट करावे.’

पुढे बोलताना देशमुख यांनी म्हटले आहे की, ‘कारखान्याकडे कामगारांचे देणे बाकी आहे. बँकेचे देणे राहिलेले आहे मग त्यांचे कसे नियोजन केले आहे याची माहिती जाहीर करणे आवश्यक आहे. हा कारखाना सभासदांचा आहे. भाडेतत्वार कारखाना दिला तर सभासदांचा मालकी हक्क राहणार आहे का ? कारखान्याच्या अध्यक्षांनी हा कारखाना सहकारीच सुरु करणार असे सांगितले होते. मात्र आता भाडेतत्वावर देण्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष आमदार पाटील यांनी स्पष्टीकरण द्यावे’, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘कामगारांची देणी देतो, कारखाना सहकारी तत्त्वावरच सुरु करतो’, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार पाटील यांनी दिला होता मग आता अडचण का आली ? हे स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी आमदार पाटील यांचे नाव न घेता केले आहे. ‘रस्ते विकासासाठी तुम्ही निधी आणला असे म्हणता मग कारखान्यासाठी निधी का मिळवला नाही’ असा टोला देशमुख यांनी आमदार पाटील यांना. लगावला आहे.

‘भोत्रे पाटील यांनी अद्याप कारखान्याची देणी दिली नाहीत. मग अशा स्थितीत आदिनाथ कारखाना त्यांनाच दिला तर काय करायचे ?’ असा प्रश्नही देशमुख यांनी केला आहे. कारखाना भाडेतत्वार देण्यासाठी आमचा विरोध नाही मात्र कारखाना कशाप्रकारे तुम्ही सुरु करणार हे स्पष्ट करा ? आमची विकासाला अडथळा निर्माण करण्याची प्रवृत्ती नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *