करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातील पाणी हळगाव येथे देण्याच्या निर्णयाला तालुक्यातील अनेक गावांतून विरोध होत असून विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनीही याबाबत आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत समितीची भूमिका मांडली.

कांबळे यांनी सांगितले की, मांगी मध्यम प्रकल्पाच्या उभारणीसाठी देशभक्त कै. नामदेवराव जगताप यांनी मोठे प्रयत्न केले होते. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू करमाळा तालुक्यात आले होते. हा प्रकल्प पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तो नियमित भरण्यासाठी शासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही.

त्यांच्या मते, मांगी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून राहण्यासाठी कुकडी धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था प्रथम करण्यात यावी. त्यानंतरच या प्रकल्पातील पाणी इतर भागात वळविण्याचा निर्णय घ्यावा. सध्या उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तलावातील पाणीसाठा संपुष्टात येतो आणि तलाव कोरडा पडतो. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. अनेकदा पिके करपून जातात आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

“जेवढे उपलब्ध पाणी आहे तेही स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यास अपुरे पडत असताना ते इतरत्र देण्याचा निर्णय योग्य नाही. शासनाने प्रथम तलावात वर्षभर पाणी उपलब्ध राहील, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी. त्यानंतरच पाणी इतरत्र नेण्याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढावा,” अशी मागणी त्यांनी केली.

यासंदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास करमाळा तालुक्यातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना आणि शेतकरी कामगार संघर्ष समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही दशरथ अण्णा कांबळे यांनी दिला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *