करमाळा प्रतिनिधी

बागल कुटूंबाने आदिनाथ कारखान्याची दुरावस्था करुन कारखाना आर्थिक डबघाईला आणला असल्यानेच आज आदिनाथ वर लिलावाची परिस्थिती ओढावली गेली. मागील सतरा वर्षाच्या काळातील चुकीचे निर्णय व मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचारामुळे आदिनाथ वर बिकट वेळ आली असल्याचा आरोप आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे. यामुळे परत एकदा आदिनाथ वरुन राजकीय वातावरण तापले जाणार असे दिसते आहे. काही दिवसांपूर्वी आदिनाथ कारखान्याच्या लिलावावरुन बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वर आरोप केले होते. त्यावेळी पाटील गटाकडून आरोपाचे खंडण केले गेले व बारामती एग्रो व आदिनाथ यांच्यातील करारा दरम्यान झालेल्या खऱ्या घडामोडी सभासदांच्या समोर मांडल्या गेल्या होत्या. तसेच बागलांच्या मदतीने बारामती एग्रोला बाजुला सारुन माजी आमदार संजयमामा शिंदे व बारामती एग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनाच वैयक्तिक पणे आदिनाथ विकत घ्यायचा होता असा गंभीर आरोप देखील करण्यात आला होता. आज परत एकदा श्वेतपत्रिका काढून बागलांचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे पाटील गटाकडून जाहीर करण्यात आले असल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, आदिनाथ कारखान्याच्या आर्थिक दुरावस्था ही गेल्या सहा महिन्यांत झाली नसुन यास मागील सतरा वर्षाचा कारभार जबाबदार आहे. आदिनाथ कारखान्यावर सर्वाधिक काळ बागल गटाचीच सत्ता असल्याने त्यावेळी घेतले गेलेले चुकीचे निर्णय व भ्रष्टाचाराचाराने बरबटलेल्या कारभारामुळेच आदिनाथ कर्जाच्या खाईत गेला आहे. वास्तविक पाहता बागलांनी आदिनाथ कारखान्याच्या सर्व यंत्रणेचा तसेच तिजोरीचा वापर हा मकाई कारखान्यासाठी केला. आदिनाथ कडे बागलांनी वापरा आणि फेकून द्या अर्थात युज ऍंड थ्रो प्रमाणे पाहिले. परंतु आजमितीला बागलांना मकाई कारखाना सुध्दा चालवता आला नाही. मकाई कारखान्यास शासनाच्या मदतीने मिळालेल्या १४० कोटी रुपयांचे काय झाले ? मकाईस आर्थिक मदत मिळूनही मकाई का सुरु झाला नाही ? या प्रश्नांची उत्तरे बागलांनी सभासदांना द्यावीत. आदिनाथच्या कारभाराबाबत बागल गट नेतृत्वास आपले खुले आव्हान असून मागील सतरा वर्षातील कारभारावर त्यांनी प्रसिध्दी माध्यमांच्या समोर आमनेसामने येऊन आपली बाजू मांडावी. तसेच आदिनाथ आणि बारामती एग्रो बरोबर झालेला करार याबद्दलही सर्वकाही सभासदांच्या समोर मांडावे. आजमितीला बागलांकडे या प्रश्नांची उत्तरे नाहीत. केवळ आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आपला पॅनल उभा नाही करुन भ्रष्टाचाराचे आरोप नष्ट होतील व घोडे गंगेत नाहले जाईल अशा भ्रमातुन बागलांनी बाहेर पडावे. करमाळा तालुक्यातील जनतेने आदिनाथ कारखान्याच्या कारभारावरुनच अनेक गावात बागलांच्या  प्रचार सभा सुध्दा होऊ दिल्या नाहीत. वाहतुकदार व कामगार  हे प्रसिध्दी माध्यमांच्या समोर येऊन बागलांनी केलेल्या अन्याया बाबत खुलेआम बोलत होते. हा काळ लोटुन फार वर्षे झाली नाहीत. आजही तिच परिस्थिती आहे. यामुळे बागलांच्या भ्रष्टाचाराचा पाढा जनतेसमोर आम्ही मांडतच राहणार आहोत. बागल गट नेतृत्वाने आपले आरोप खोडून दाखवावेत असे थेट आव्हान पाटील गटाकडून प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *