करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप व ऑक्टोबर फेरीचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) करमाळा तालुका अध्यक्ष भरत भाऊ अवताडे यांनी तालुक्याच्या वतीने दिला आहे.

याबाबत कुकडी डावा कालवा उपविभाग क्रमांक १२ चे उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तालुका अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भारत (भाऊ) विठ्ठल आवताडे यांनी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दहिगाव उपसा सिंचन योजना उजनी धरणावर अवलंबून असून सध्या धरणात सुमारे ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापूर्वी २०२६ च्या उन्हाळी आवर्तनात अनेक गावांना पाणी मिळाले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार आणि आंदोलने करूनही संबंधित गावांना जाणीवपूर्वक पाणी देण्याचे टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यंदाच्या खरीप आवर्तनात दहिगाव उपसा सिंचन योजनेअंतर्गत उन्हाळी आवर्तनापासून वंचित असणाऱ्या गावांना प्राधान्याने पाणी देऊन मागील अन्यायाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा वंचित गावांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊन त्याचे पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून उमटतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनाची वेळ येऊ न देता प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन संबंधित गावांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) करमाळा तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *