करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सध्या महावितरणच्या वीजपुरवठा धोरणामुळे मोठ्या अडचणीत सापडले असून, शेतीपंपासाठीच्या फिडरवर थ्री फेज व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा पूर्णवेळ सिंगल फेज वीजपुरवठा दिला जात नसल्याने ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणारे लोडशेडिंग शेतकरी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करत आहे.

करमाळा तालुक्याच्या तुलनेत माळशिरस व इंदापूर तालुक्यातील बावडा परिसरात परिस्थिती वेगळी दिसून येते. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे तसेच शेतकरी एकजुटीच्या आंदोलनानंतर त्या भागात सायंकाळी ६ ते १० या वेळेतील लोडशेडिंग मोठ्या प्रमाणावर बंद करण्यात आले असून, पूर्णवेळ सिंगल फेज वीजपुरवठा तसेच शेतीसाठी किमान सहा तास पूर्ण दाबाने थ्री फेज वीजपुरवठा सुरू असल्याचे समोर आले आहे. मग करमाळा तालुक्यालाच वेगळा न्याय का ? असा प्रश्न आता शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकरी कोणतीही अवास्तव मागणी करत नाहीत. त्यांची मागणी केवळ न्याय्य आणि जीवनावश्यक आहे. शेतकरी बांधवांना पूर्णवेळ सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, शेतीसाठी दररोज किमान सहा तास पूर्ण दाबाने थ्री फेज वीज मिळावी आणि सायंकाळी ६ ते १० या वेळेतील अन्यायकारक लोडशेडिंग पूर्णपणे बंद करण्यात यावे, एवढीच अपेक्षा आहे.

यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि संबंधित जबाबदार व्यक्तींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकमताने भूमिका घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करून करमाळा तालुक्याला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलावीत. माळशिरस आणि इंदापूरमध्ये शक्य झाले, तर करमाळ्यात का नाही ? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे.

आज करमाळा तालुक्याला केवळ आश्वासनांची नव्हे, तर ठोस कृतीची आवश्यकता आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे, आणि त्या कण्यालाच अंधारात ठेवणे योग्य नाही. करमाळा तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्रित पुढाकार घ्यावा, हीच तालुक्यातील जनतेची कळकळीची अपेक्षा आहे – श्रीकांत साखरे (करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *