
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शाळांच्या धोकादायक व मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांचे त्वरित पाडकाम करून नवीन वर्ग बांधकामासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस हनुमंत मांढरे-पाटील यांनी केली आहे. करमाळा तालुक्यातील, सावडी, सौंदे, शेळगाव(क), मांगी, शेलगाव, कोंढार चिंचोली, पांडे, कंदर, ज्ञानेश्वर नगर, वडशिवणे, राजुरी, वरकटने, दिवेगव्हाण या गावांत मोडकळीला आलेल्या धोकादायक खोल्यांमध्ये वर्ग भरत आहेत विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत धरून दिवस काढत आहेत.

सदर शाळेमधील काही गावांच्या शाळा दुरुस्तीचे काम जिल्हास्तरावर मंजूर झाले असून काही गावातील शाळांचे दुरुस्तीचे काम तालुकास्तरावर प्रस्तावित आहे.
यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकाच्या जिवीतास मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु तरी देखील नाईलाजास्तव वर्ग खोल्या अशा ठिकाणी भरवाव्या लागत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निवारा नसल्याने शाळा अशा धोकादाय खोल्यांमध्ये भरतअसल्याने ऐन पावसाळ्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलकोट तालुक्यात नुकतीच अशी दुर्घटना घडली असून शाळेचा छत कोसळून विद्यार्थ्यांसह काही शिक्षक जखमी झाले आहेत. त्या घटनेनंतर देखील आजून प्रशासनाला जाग आल्याचे दिसून येत नाही कोणताही ठोस निर्णय उपाययोजना करताना दिसून येत नाही अशी घटना घडू नये म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अक्कलकोट तालुक्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती करमाळा तालुक्यात घडून जिवीत हानी होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल मांढरे -पाटील यांनी उपस्थित केला. लवकरात लवकर समिती गठीत करून तालुक्यातील शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य ती उपायोजना करावी जेणेकरून भविष्यात दुर्घटना होणार नाही अशी मागणी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस हनुमंत मांढरे-पाटील यांनी केली आहे.
