करमाळा शहराचा पाणीप्रश्न सुटणार; नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांच्या प्रयत्नांना मोठे यश!
पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या विशेष सहकार्याने दोन मोठ्या कामांना ६६.५३ लाखांची प्रशासकीय मंजुरी; नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी मानले आभार.

करमाळा प्रतिनिधी:- करमाळा शहराचा पाणी पुरवठा वीज पुरवठा खंडित झाल्याने वारंवार विस्कळीत होत होता, ज्यामुळे करमाळकरांना पाण्यासाठी अतोनात हाल सोसावे लागत होते. नागरिकांची ही गंभीर समस्या ओळखून करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल फंड तसेच सर्व नगरसेवक यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या कामासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे विशेष सहकार्य लाभले असून, त्यांच्याच माध्यमातून करमाळा शहराच्या विकासासाठी हा भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. याबद्दल नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत व उपनगराध्यक्ष अतुल फंड यांनी पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे विशेष आभार मानले आहेत. पालकमंत्र्यांच्या खंबीर पाठबळामुळे शहराच्या पाणी पुरवठ्याशी संबंधित दोन मोठ्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून करमाळा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
सध्या करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव येथील पंपहाऊसला ‘जेऊर’ सबस्टेशनवरून वीज पुरवठा केला जातो. मात्र, जेऊर ते दहीगाव हे अंतर जास्त असल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होणे किंवा नैसर्गिक कारणांमुळे वीज खंडित होण्याचे प्रमाण मोठे होते. याचा थेट फटका शहराच्या पाणीपुरवठ्याला बसत होता.
यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता जेऊर ऐवजी थेट दहीगाव येथील सबस्टेशनवरूनच पंपहाऊसला वीज पुरवठा केला जाणार आहे.
या बदलासाठी नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांनी सर्वप्रथम जेऊर, त्यानंतर बार्शी आणि शेवटी सोलापूर अशा सर्व स्तरांवरील महावितरणच्या प्राथमिक परवानग्या मिळवल्या. अखेर या कामासाठी २९ लाख ९४ हजार ४८० रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे.
शहरांतर्गत पाणी पुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी नगरपालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मेन रोड या मुख्य मार्गावरील नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या कामासाठी ३६ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. या नवीन पाईपलाईनमुळे संबंधित भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने व वेळेवर पाणी मिळणे शक्य होणार आहे.
नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यापासून करमाळा शहरातील रखडलेली विकास कामे मोठ्या प्रमाणावर मार्गी लागत आहेत. “शहराचा विकास आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना आमचे पहिले प्राधान्य आहे. ही महत्त्वपूर्ण कामे मंजूर करून आणताना उपनगराध्यक्ष अतुल फंड यांच्यासह करमाळा नगरपरिषदेतील सर्व नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे,” अशी भावना नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्षांच्या या धडाडीच्या कामगिरीमुळे करमाळा शहरातील नागरिकांमधून अत्यंत समाधान व्यक्त होत असून, पाणी टंचाईच्या त्रासातून लवकरच कायमची सुटका होणार असल्याने प्रशासनाचे आभार मानले जात आहेत.