सैनिकांच्या प्रश्नांवर चर्चा, कारगिल भवन व शहीद स्मारक कामांना गती

करमाळा प्रतिनिधी

आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटना करमाळा तालुक्याची बैठक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या तसेच भावनिक वातावरणात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील शहीद जवानांना तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित सैनिक व नागरिकांनी उभे राहून शहीदांना मानवंदना दिली.

बैठकीत सैनिकांच्या पेन्शन, CSD कॅन्टीन, ECHS, CEA तसेच विविध शासकीय योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. करमाळा येथे उभारण्यात येत असलेल्या कारगिल भवनाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. हे कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व सैनिकांनी एकजुटीने व टीमभावनेने अनेक दिवस काम केले असून त्याबद्दल अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

यावेळी सैनिकांच्या शेती, बांध, रस्ते तसेच विविध अडीअडचणींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्या संदर्भात करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम तसेच करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याशी सविस्तर संवाद साधण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीत संचालक बाबासाहेब बोलभट, मार्गदर्शक तथा वीर पिता अरविंद निलंगे, मार्गदर्शक शिवाजी भंडारी, माजी सैनिक अशोक शिंदे, माजी सैनिक नवनाथ देवकाते तसेच माजी सैनिक जाधव यांनी मनोगत व्यक्त करत सैनिकांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. देशसेवा, शौर्य आणि सैनिक परिवारांच्या योगदानाविषयी उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी अध्यक्षांनी सांगितले की, कुंभेज येथे शहीद जवान आप्पासाहेब काटे यांच्या स्मृतीस्थळाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी सैनिक, शहीद जवानांचे परिवार तसेच सैनिक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीनंतर सर्वांसाठी चहापानाचे आयोजन करण्यात आले. संघटनेचे सचिव बिभीषण कन्हेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीत व ‘भारत माता की जय’ घोषणेनंतर बैठकीची सांगता करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *