
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील तीव्र पाणीटंचाई दूर करण्यासाठी नगरसेविका सुवर्णा आल्हाट यांचे चिरंजीव चेतन आल्हाट यांनी नगरपरिषदेला निवेदन देऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. नगरपरिषदेच्या या उदासीनतेमुळे प्रभागातील महिला व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आता केवळ निवेदनावर न थांबता आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग ६ मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हक्काचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. याबाबत चेतन आल्हाट यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र ‘निवेदन द्या आणि विसरून जा’ अशा भूमिकेत नगरपरिषद प्रशासन असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.

चेतन आल्हाट यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, “आम्ही लोकशाही मार्गाने निवेदन देऊन प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जर पुढील काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.”

करमाळा नगरपरिषदेने प्रभाग ६ मधील तांत्रिक बिघाड किंवा नियोजनाचा अभाव तातडीने दूर करावा, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.