
करमाळा प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त ओम महिला मंडळाचा आम्ही मैतरणी मैतरणी पुरस्कार वितरण आणि एचपीवी वैक्सीन जनजागृती कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. स्वराज्य संस्थापिका माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मोहिनी सावंत होत्या तर प्रमुख मान्यवर म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला गायकवाड, डॉ. अपर्णा भोसले व डॉ.कविता कांबळे या उपस्थित होत्या.

महिलांच्या कार्याची दखल सहसा कोणी घेत नाही. पण आज या मंडळाने विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्काराने सन्मानित करुन एक नवा इतिहास घडवला असे मत मोहिनी सावंत यांनी व्यक्त केले.
राजकीय गौरव पुरस्कार सुनिताताई वाशिंबेकर, आदर्श गुरुवर्या पुरस्कार निलिमा पुंडे, संघर्ष सन्मान पुरस्कार.सतिश शिंगाडे व सुवर्णा शिंगाडे या दांपत्यास तसेच सशक्त महिला सन्मान पुरस्कार हा होमगार्ड सरोज परदेशी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना निलिमा पुंडे म्हणाल्या की, आज पुरस्कार म्हणजे एक बाजार झाला आहे पण आज ओम महिला मंडळाने पुरस्कारासाठी योग्य रत्ने निवडली ही कौतुकास्पद अशी बाब आहे. चौतीस वर्ष सेवेची दखल आज घेतली गेली.
माजी नगराध्यक्षा सुनिताताई वाशिंबेकर म्हणाल्या माझ्या आयुष्यातील हा पहिला सन्मान आहे जो साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांच्या ओम महिला मंडळाने केला आहे. महिलांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओम महिला मंडळ नावाजले जाते. राजकीय गौरव पुरस्कार देऊन मला सन्मानित केले मी आभारी आहे.
तळागाळातील महिलांच्या कार्याचे कौतुक करुन शाबासकीची थाप टाकली. हा पहिला पुरस्कार स्विकारताना मी भारावून गेले. स्वप्नात ही वाटलं नव्हतं मला पुरस्कार मिळेल असे मत सरोज परदेशी यांनी मांडले.
सौरभ शिंगाडे म्हणाले माझ्या आईबाबांचा संघर्ष आज पुरस्कार रुपात येतोय. कोण दखल घेतोय अशा चार भिंतीतल्या संघर्षाची ? आयुष्यातील हा पहिला पुरस्कार देऊन मंडळाने तळागाळातील महिलांना समाजासमोर आणले. इथून पूढे ओम मंडळाच्या कार्यात माझा खारीचा वाटा असेल.
पुस्तके, फेटा, महावस्त्र, ट्राफी देवून सर्व सत्कारमूर्तींना गौरविण्यात आले. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निर्बंध जनजागृती वर डॉ. कविता कांबळे यांनी मार्गदर्शन करुन लवकरच आपण ओम महिला मंडळ अंतर्गत यावर काम करणार आहोत अशी माहिती दिली.
डॉ. अपर्णा भोसले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला तर साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले.
जयश्री वीर, लक्ष्मी कटारिया, पल्लवी निंबाळकर, जयश्री लुणिया, उषा बलदोटा, अलका यादव, शहनाज मोमीन,मितवा अग्रवाल, सुनिता यादव, ज्योती पांढरे, सुवर्णा लुणिया यांनी मोलाचे योगदान दिले.
नगरसेवक संजय सावंत, नगरसेवक दिपक चव्हाण, जगदीश शिगची, मयंक अग्रवाल, नितीन ओंभासे यांची मोलाची साथ लाभली. करमाळ्यातील विविध क्षेत्रातील महिला व पुरुष मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विलोभनीय शैलीतून सूत्रसंचलन सुवर्णा पाटणे यांनी केले तर आभार पुष्पा लुंकड यांनी मानले. ज्ञानोबांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.