करमाळा प्रतिनिधी
करमाळा बस स्थानकात काही दिवसांपूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात करमाळा पोलिसांना यश आले असून, या प्रकरणी एका महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सावंत गल्ली येथील कमल शिवाजी खुळे या आपल्या मुलीकडे पुण्याला जाण्यासाठी परांडा-स्वारगेट बसमध्ये चढत होत्या. दि. २४ रोजी सकाळच्या सुमारास बस स्थानकात मोठी गर्दी असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून सुमारे ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, रोख ५०० रुपये तसेच अंदाजे १५ हजार रुपये किमतीचे पैंजण असा मुद्देमाल लंपास केला होता.
या घटनेनंतर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण पथकाला तपासाच्या सूचना देण्यात आल्या.


तपासादरम्यान पोलिसांनी बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली असता, फिर्यादीच्या पाठीमागे संशयास्पद हालचाली करणारी एक महिला दिसून आली. त्यानुसार पुढील शोध घेतला असता ही महिला करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण येथील गुडी चैतन्य काळे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने सदर चोरी केल्याची कबुली दिली असून, तिच्याकडून चोरी केलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
सदर महिला आरोपीस अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोहेकॉ मोहोळकर करीत आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *