करमाळा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, पोथरे आणि कोर्टी,अर्जुननगर या गावांमधील रूपांतरित साठवण पाझर तलावाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि निकृष्ट काम झाल्याचा आरोप करत, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘पोतराज’ वेशभूषा करून आणि ‘जागरण गोंधळ’ घालत सरकारचे लक्ष वेधून घेतले.

या आंदोलनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाने भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने नितीन दुसाने (मुख्य अभियंता), चेतन कलशेट्टी (अधीक्षक अभियंता), सुहास गायकवाड (दक्षता गुण नियंत्रण पथक), राहुल शिरसागर (कार्यकारी अभियंता, जलसंधारण विभाग) यांच्यावर एसआयटी (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निकृष्ट कामाकडे डोळेझाक करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

तलावाचे काम करणाऱ्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचे शिवाजी तळेकर यांनी प्रशासनाची दिशाभूल करून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्यामुळे तळेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना ‘ब्लॅकलिस्ट’ (काळ्या यादीत) टाकण्यात यावे, अशी आग्रही मागणी सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी केली आहे.

आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनात बॅनरबाजी आणि पारंपरिक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. या आंदोलनात अब्बास अली यादगीर, मुजाहिद सय्यद, प्रवीण चव्हाण, प्रताप तळेकर, सोमनाथ देवकर, मच्छिंद्र कोकाटे, रवींद्र मोरे, वैभव कोकाटे यांच्यासह करमाळा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

……………………..

“शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी असलेल्या तलावांच्या कामात भ्रष्टाचार करणे हा गुन्हा आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने जनतेचा पैसा लाटला जात आहे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.” — अजित कुलकर्णी (सोलापूर शहराध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष)

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *