
पुणे विभाग स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रदीप भुईचे निर्विवाद वर्चस्व
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुणे विभाग स्तरीय धावण्याच्या स्पर्धेत कोंढार चिंचोली येथील प्रदीप भुई याने १७ वर्षे वयोगटात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले….
कोंढार चिंचोली गावचा सुपुत्र आणि सध्या त्रिमूर्ती विद्यालय टाकळी या ठिकाणी अकरावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रदीप भुई याने पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालेल्या पुणे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये ८०० मीटर आणि १५०० मीटर धावण्यामध्ये धडाकेबाज कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करून दाखवले. शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी प्रदीपची निवड झाली आहे.

विशेष म्हणजे पुणे विभागामध्ये पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर शहर, अहमदनगर ग्रामीण , सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहर या प्रत्येक ठिकाणी क्रमांक पटकावलेल्या पहिल्या दोन खेळाडूंमधून अव्वल ठरत प्रदीपने सर्वांनाच आपली गुणवत्ता दाखवून दिली…
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात शालेय क्रीडा स्पर्धाच झाल्या नव्हत्या.
नदीकिनारी राहणारा मच्छीमार कुटुंबातील प्रदीप भुई हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन शाळेतील प्राथमिक शिक्षक बाळासाहेब बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढार चिंचोली येथे डांबरी रस्त्यावर सराव करतो. वेगवेगळ्या प्रबोधिनी अकॅडमी कोचिंग क्लासेस तसेच अद्यावत सुविधा असणाऱ्या ठिकाणी सराव करणाऱ्या मुलांना धक्का देत प्रदीपने हे यश मिळवले आहे. कुठल्याही अद्ययावत सुविधा उपलब्ध नसताना आणि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही केवळ अफाट मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावरच प्रदीपने हे यश खेचून आणले आहे.
“तुम्हाला किती अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत, त्यापेक्षा तुमच्या मध्ये जिंकण्याचे वेड किती आहे , कठोर परिश्रम करण्याची तुमची तयारी किती आहे यावरच तुमचं उज्वल भविष्य अवलंबून असते” असं यावेळी त्याचे मार्गदर्शन बाळासाहेब बोडखे यांनी सांगितले.

सामान्य कुटुंबातून कसलीच खेळाची पार्श्वभूमी नसणाऱ्या प्रदीपने हे यश खेचून आणल्याबद्दल सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. “भलेही मला कोणतीही खेळाची पार्श्वभूमी नसो पण मला यावर्षी सोलापूर जिल्ह्याचे नाव राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गाजवायचे आहे आणि या स्पर्धांमध्ये यश मिळवायचे आहे ” असे यावेळी प्रदीप भुई म्हणाला.
या यशाबद्दल राज्य क्रीडा मार्गदर्शक गणेश पवार, करमाळ्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक चेतन धनवटे,जिंतीचे केंद्रप्रमुख महावीर गोरे, कोंढार चिंचोली सरपंच शरद भोसले आणि सर्व सदस्य, त्रिमूर्ती विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कोकाटे तसेच क्रीडा शिक्षक ईश्वर तोरडमल, तसेच क्रीडा प्रेमी शिक्षक यांनी प्रदीप भुईचे आणि बाळासाहेब बोडखे यांचे विशेष अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
