
उजनी जलाशयावर ८५० मीटर लांबीच्या पुलाचा प्रकल्प होणार साकार चांडगाव ता. इंदापुर ते पोमलवाडी ता. करमाळा पुल होणार साकार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
अर्थसंकल्पात ३४० कोटी रुपयांची तरतूद ; इंदापूर–करमाळा अंतरात सुमारे ४० किमी बचत
मुंबई, दि. ०६ मार्च २०२६ :
आज सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर (जि. पुणे) आणि करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यांना थेट जोडणाऱ्या उजनी धरणाच्या जलाशयावर उभारण्यात येणाऱ्या चांडगाव ता. इंदापुर ते पोमलवाडी ता. करमाळा दरम्यान भव्य पुल प्रकल्पासाठी ३४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुलामुळे दोन्ही तालुक्यांमधील दळणवळण सुलभ होणार असून सुमारे ४० किमी अंतर कमी होऊन वेळ आणि इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि पर्यटनाला चालना मिळून परिसराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी माहिती कृषी मंत्री तथा इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

याबाबत बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “हा महत्त्वाकांक्षी पूल पूर्ण करण्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी इंदापूरकरांना भर सभेत दिलेले आश्वासन आज प्रत्यक्षात साकार होत आहे. या पुलासाठी भक्कम निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व इंदापूरकरांच्या वतीने आभार. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचेही विशेष सहकार्य लाभले असून त्यांचे मनःपूर्वक आभार.”
बारामती–लाकडी कळस–लोणी देवकर–चांडगाव रस्ता (प्रजिमा-६५) ते कोर्टी–दिवेगव्हाण–पारेवाडी रेल्वे स्टेशन–केतुर नं.२–पोमलवाडी रस्ता (प्रजिमा-१२४) यांना जोडणाऱ्या या पुलाची प्रस्तावित लांबी सुमारे ८५० मीटर आहे. या महत्त्वाच्या पायाभूत सुविधेसाठी अंदाजे ३४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

इंदापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या दक्षिण-उत्तर दिशेने सुमारे ४६ किमी लांबीचा असून तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात उजनी धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. त्यामुळे सध्या इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील दळणवळण हे उजनी धरणास वळसा घालून भिगवण (ता. इंदापूर) किंवा टेंभुर्णी (ता. माढा) मार्गे करावे लागते. परिणामी सुमारे ७० किमीचे अंतर, अधिक वेळ आणि इंधन खर्च वाढतो.
मात्र इंदापूर तालुक्यातील चांडगाव येथून उजनी पाणलोट क्षेत्र ओलांडत पोमलवाडी (ता. करमाळा) येथे पूल उभारल्यास दोन्ही तालुक्यांमधील अंतर सुमारे ४० किमीने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन खर्चात मोठी बचत होईल. लोणी देवकर (पुणे–सोलापूर महामार्ग) ते चांडगाव हे अंतर अवघे ७ किमी असल्याने या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यांतील संपर्क अधिक सुलभ होणार आहे.
या पुलामुळे पोमलवाडी तसेच उजनी धरणकाठच्या गावांतील नागरिकांना व्यापार, शिक्षण व वैद्यकीय सेवांसाठी इंदापूर, बारामती तसेच पुणे येथे येणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच इंदापूर, बारामती, दौंड आणि कर्जत तालुक्यातील साखर कारखान्यांनाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी देखिल याबाबत पाठपुरावा केला होता व स्व. उपमुख्यमंत्री अजितदादांकडे आग्रही मागणी केली होती.
याशिवाय उजनी धरण परिसरातील फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार असल्याने स्थानिक पर्यटन आणि व्यवसायालाही चालना मिळणार आहे. आमचा ड्रिम पोजेक्ट चांडगाव ते पोमलवाडी पुल साकारण्यासाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचे विशेष आभार. या पुलाकरीताचे पहिली फाईल करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांकडे दिली होती. दादांनीही ती मागणी पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. इंदापुरचे आमदार व मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखिल विशेष दखल घेत इंदापुर व करमाळाकरांना आश्वासित केले होते. दादांचा वादा पुर्ण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहीनी पवार, मंत्री दत्तामामा भरणे, मा. आमदार संजयमामा शिंदे यासह सर्वांचे आभार व्यक्त करतो – ॲड. अजिनाथ विघ्ने (पं. स. सदस्य)