
करमाळा प्रतिनिधी
शालेय पोषण आहार योजनेतील हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार समोर आला असून सावंत गटाचे नेते सुनिल बापू सावंत व करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक संदीप कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला येथे अचानक धडक भेट दिली. यावेळी विनोद महानावर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यालाच शासनाने ठरवून दिलेल्या दररोजच्या मेनूबाबत माहिती नसल्याचे उघड झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित इतक्या महत्त्वाच्या योजनेत असा निष्काळजीपणा आढळल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

नगरसेवकांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
याच दरम्यान शाळेतील स्वच्छतागृहांचीही पाहणी करण्यात आली असून स्वच्छता व देखभाल बाबत कठोर सूचना देण्यात आल्या.