
लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय गौरव सोहळा संपन्न
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आळजापूर गावाचे सरपंच संजय रोडे यांना त्यांच्या उल्लेखनीय विकासकार्याबद्दल “महाराष्ट्र ग्रामरत्न सरपंच सन्मान आणि गौरव पुरस्काराने” नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा लोणावळा (जि. पुणे) येथे अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्यावतीने मोठ्या उत्साहात पार पडला.

ग्रामविकास क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान, नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी, तसेच ग्रामपातळीवर लोकसहभागातून विकास साधण्याच्या प्रयत्नांबद्दल सरपंच रोडे यांची निवड या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी करण्यात आली. या सोहळ्यात राज्यभरातील अनेक सरपंच, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामविकास क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आळजापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच संजय रोडे यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात विविध अभियानात्मक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत, स्वतः सिव्हिल इंजिनिअर असल्याने गावात घरकुल बांधकाम असो किंवा कोणाला घर बांधायचे असेल तर घराचा नकाशा व सर्व डिजाईन मोफत सेवा दिली जाते, स्वखर्चाने जिल्हा परिषद शाळेसाठी मदत करणे, गुणवंत विध्यार्थी सन्मान, शालेय साहित्य वाटप, गावाला RO प्लांट द्वारे पाणी, हर घर जल योजना दोन टप्प्यात राबविणे, विविध विकास कामांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, पुढील काळात गावात सौर ऊर्जा, CCTV यांचा वापर करण्यासाठी नियोजन आहे.
CSR निधीतून पाणलोट विकास कामे केले जात आहेत व आरोग्य शिबीर घेतले जात आहेत. अश्या अनेक कामाच्या आधारे, गावात शाश्वत विकास करण्यावर भर दिला आहे. संजय रोडे यांच्या कार्याचा गौरव करताना आयोजकांनी सांगितले की, “ग्रामपातळीवरूनही नेतृत्व, दृष्टीकोन आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या माध्यमातून बदल घडवता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सरपंच रोडे.”
पुरस्कार स्वीकृत करताना सरपंच संजय रोडे यांनी सांगितले की, “हा सन्मान माझा नसून आळजापूर ग्रामस्थांचा आहे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामपंचायत अधिकारी श्री निकम भाऊसाहेब यांचे देखील सहकार्य लाभले यामुळेच ग्रामपंचायतीचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक योजना ही लोकसहभागातूनच यशस्वी झाली आहे. पुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध राहीन.”
या पुरस्कारप्राप्तीनंतर करमाळा तालुक्यात तसेच संपूर्ण परिसरात सरपंच रोडे यांचे अभिनंदन केले जात असून, विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.