
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं.१ या शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त आणि फटाकेमुक्त अशी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि गोडवा आणणारा सण. पण दिवसेंदिवस या सणाचे रूप बदलत चालले आहे. वेगवेगळे कर्कश आवाज करणारे आणि जीवघेणा धूर तयार करणारे फटाके वाजवल्याने ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होऊन कचराही मोठ्या प्रमाणात तयार होतो. शिवाय सजावटीसाठी शेतामध्ये उत्पादित केलेल्या नैसर्गिक झेंडू, शेवंती अथवा इतर फुलांऐवजी स्वस्त वाटणा-या प्लास्टिकच्या फुलांचा, आकाशकंदीलचा वापर वाढत चालला आहे. यामुळे किती तरी प्लास्टिक पर्यावरणात येते. ज्याचे लवकर विघटनही होत नाही आणि ते पर्यावरणाची हानी करते.त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी फटाके मुक्त आणि प्लास्टिक मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन शाळेतील शिक्षकांनी सर्वांना केले.

याबाबत मुलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी खातगाव नंबर एक शाळेतील शिक्षक बाळासाहेब बोडखे आणि बिभिषण सातपुते यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन तर केलेच शिवाय या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन कार्डशिट आणि घोटीव कागदापासून पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवले आहेत. यामध्ये प्लास्टिकचा कसलाच वापर केलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद भेटला, शिवाय प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण दिल्यामुळे त्यांचे कौशल्य वाढले, त्यांच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढली, शिवाय प्लॅस्टिकच्या बाबत जागृती घडवून आणता आली.
शिवाय सर्वांनी मिळून बनवलेले आकाश कंदील कसलाही भेदभाव न करता लकी ड्रॉ पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले . एवढेच नाही तर ग्रामस्थांना असेही आवाहन करण्यात आले आहे की, सर्वांनी असेच पर्यावरण पूरक आकाश कंदील बनवावेत आणि प्लास्टिकचा वापर टाळावा. या उपक्रमामुळे आज काही प्रमाणात का होईना पण प्लास्टिक खातगावमध्ये येण्यापासून थांबणार आहे असे मत या दोन्ही शिक्षकांनी व्यक्त केले.
शिक्षणाबरोबरच जबाबदार आणि संवेदनशील नागरिक घडवण्यासाठी शाळेमध्ये असे संस्कारक्षम उपक्रम राबविल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, शि.वि.अ. जयवंत नलवडे, जगताप मॅडम, मिनीनाथ टकले, केंद्रप्रमुख महावीर गोरे यांनी बिबीशन सातपुते आणि बाळासाहेब बोडखे यांचे विशेष कौतुक केले.