करमाळा प्रतिनिधी
राजे रावरंभा निर्मित श्री कमलादेवी देवस्थान हे ऐतिहासिक, भव्य, पुरातन मंदिर मूळ स्वरूपात आणून जीर्णोद्धार करणे हे करोडों रूपयांचे काम गेल्या दोन-तीन वर्षाँपासून सुरु आहे. या कामाच्या एकूण खर्चाचा प्रस्ताव मला दया, तो निधी मी पुरातत्व खात्याकडून तुम्हाला मंजूर करून देतो असे ठाम आश्वासन तत्कालिन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले होते आणी मी त्याबाबत अनेकदा पाठपुरावा करुन देखील देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाला या कामाचे श्रेय फक्त आपल्यालाच मिळायला हवे या मानसिकतेतून त्यांनी तसा प्रस्ताव दिला नाही. असा आरोप ज्येष्ठ पत्रकार तथा मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी केला आहे. याबाबत बोलताना येवले म्हणाले, हे काम सध्या लोकसहभागातून धीम्या गतीने सुरु आहे. जर या कामाला शासकीय निधी मिळाला असता तर हे काम वेगाने पूर्ण झाले असते पण ट्रस्टचे अध्यक्ष हे कोणालाही विश्वासात न घेता मनमानी, एकाधिकारशाही वृत्तीने कारभार करत असल्याने देवीचा माळ ग्रामस्थ व देवस्थान पुजारी, मानकरी यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. यावेळी नवनाथ सोरटे, अंगद बिडवे, अनिल पवार, पप्पु हिरगुडे, राजेंद्र पवार, महेश सोरटे, दिलीप चव्हाण आदी अनेक ग्रामस्थ व देवस्थानचे मानकरी, सेवेकरी उपस्थित होते.