
करमाळा प्रतिनिधी
करमाळयात ओबीसी बांधवांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले स्मारकापासून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भाजी मंडई येथून रॅली तहसीलकडे मार्गस्थ झाली होती. तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढलेला हैदराबाद गॅझेटवरील जीआर रद्द करण्यात यावा. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सकल ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात आली.

शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जीआर हा राज्यातील ६० टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. यामुळे १७ टक्के आरक्षणाला धोका निर्माण झाला असल्याने हा शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यात मंडल आयोगाने केलेल्या शिफारसी ३३ वर्षापासून लागू करण्यात आले नाही, राज्यातील मायक्रो ओबीसीसाठी केंद्र शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या शिफारसी तातडीने लागू करण्यात याव्यात, राज्यातील ओबीसी प्रवर्गातील विध्यार्थ्यांना सारथी व बार्टीच्या धर्तीवर लाभ देण्यात यावा आदी मागण्या बाबत करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले आहे. या आगोदर असंख्य ओबीसी बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले होते.