
श्री कमलाभवानी मंदिरात ९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा
करमाळा – दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. च्या वतीने करमाळामधील श्री कमलाभवानी मंदिरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
२१ जून २०१५ रोजी संपूर्ण जगामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. आणि आज दिनांक २१ जून २०२५ रोजी जगामध्ये दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन भारतातील विविध ठिकाणी करण्यात आले होते. “एक पृथ्वी आणि एक आरोग्य” असे या आजच्या योगाचे स्वरूप होते. या दिनाचे औचित्य साधून ९ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सोलापूरच्या वतीने करमाळा झोनमधील धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. कमलाभवानी मंदिरामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे योग मार्गदर्शक प्रा. रामकुमार काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. जगदंबा कमलादेवी ट्रस्टचे मा .विश्वस्त श्री. डॉ. महेंद्र नगरे यांनी जीवनातील योगाचे महत्त्व व आरोग्य उत्तम राहण्यासाठी असणारी योगाची गरज याविषयी महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीचा माळचे नवनियुक्त सरपंच अमोल चव्हाण यांनी योग शिबिर देवीचा माळ या ठिकाणी घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रम प्रसंगी ९ महाराष्ट्र बटालियन चे सुभेदार श्री महेश बळगंडे व हवालदार आदित्य जाधव, करमाळ्याचे सुप्रसिद्ध डॉ. व्होटकर, प्रा. रामकुमार काळे आणि एन.सी.सी चे सर्व छात्र उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन । यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर विजया गायकवाड व आभार महात्मा गांधी विद्यालयाचे टी.ओ. असिफ मुलाणी यांनी मांडले.
