करमाळा प्रतिनिधी
संजयमामा यांचे करमाळा तालुक्यातील अस्तित्व संपले असल्याने शिंदे गटास जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन केले गेले, यामागे शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भुमिका नव्हती, असा हल्लाबोल आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला. दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामांबाबत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सांगितले की, मुळात विधानसभा आणि आदिनाथ कारखाना या दोन्ही निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः उभे होते परंतू जनतेने त्यांना दोन्ही वेळेस नाकारुन पराभुत केले. यामुळे आता करमाळा तालुक्यातील आपले अस्तित्व संपणार या भीतीपोटी माजी आमदार संजयमामा शिंदे हे निद्रानाशाच्या गर्केत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना ते तालूकापातळीवर निवडुण आणु शकत नाहीत हे सिद्ध झाल्याने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आल्यानंतर आपला बाडबिस्तारा गुंडाळून आपल्याला माढा तालूक्यातच परत जावे लागेल ही भीती माजी आमदार संजयमामा शिंदे यांना वाटु लागली आहे. यामुळे आता राजकीय इच्छा उरलेल्या अतृप्त कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांच्याकरवी ते आमदार नारायण आबा पाटील यांना बदनाम करु पाहत आहेत. मुळात सन २०२० पासून भुसंपादन प्रक्रिया बंद झाली व तसा शासन निर्णय पारित झाला. यामुळे २०१७ पासुन उपसा सिंचन योजना बंदिस्त करण्याचा शासन निर्णय पारित आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करु नये. त्यावेळी बंदिस्त पाइपलाइन करणे हे काम प्रायोगिक तत्त्वावर होते. ही अट स्विकारणे बंधनकारक नव्हते. संजयमामा शिंदे हे आमदार असताना त्यांनी शेतकऱ्यांची मते जाणून घेतली नाहीत व केवळ १०१ कोटी रुपयाच्या या योजनेत आपण आडवा हात मारु शकतो हा आत्मविश्वास बाळगुन त्यांनीच बंदिस्त पाईपलाईन या योजनेसाठी लादली. तापी खोरे महामंडळातील धरणे ही लहान आहेत व त्यांची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने त्या खोऱ्यात बंदिस्त पाईपलाईन ही संकल्पना काही उपसा सिंचन योजनेसाठी राबवली गेली. उजनी हे भीमा खोऱ्यातील मोठे धरण आहे व याची पाणी साठवण क्षमता ११५ टि एम सी इतकी आहे. यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन करुन फार तर २०० एम सी एफ टी पाणी वाचवता येईल. करमाळा तालुक्यातील काही तलावांची क्षमता यापेक्षा जास्त आहे. यामुळे खर तर दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी १.८० टि एम सी ऐवजी ३ टि एम सी पाणी आरक्षित केले जावे ही मागणी संजयमामा शिंदे यांनी करायला हवी होती. आता या योजनेसाठी बंदिस्त पाईपलाईन कामाच्या खोल मुळाशी आम्ही जाणार आहोत व येत्या आठवडाभरात यातील आर्थिक भ्रष्टाचार जनतेसमोर पुराव्यानिशी सिद्ध करणार आहोत. यामुळे शिंदे गटाकडून होत असलेल्या या आंदोलनाची शेतकऱ्यांनी तर दखल घेतली नाहीच पण आम्हीही फारसे गांभीर्याने याकडे पाहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) गटास जर पक्षाचा एवढा पुळका आज वाटत असेल तर या पक्षाची उमेदवारी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजयमामा शिंदे यांनी घ्यावी असा आग्रह केल्यावर सुध्दा शिंदे यांनी ती का नाकारली हे जनतेला सांगावे व संजयमामा शिंदे यांंच्या विरोधात एकदा रस्त्यावर उतरावे असा मार्मिक टोला प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला.
…………………….
सत्तेसाठी आपसात पॅच अप करणारांच्या तोंडुन पॅक अपची भाषा शोभत नाही. बरळण्यापेक्षा जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी.- ॲड. अजित विघ्ने प्रवक्ता- राष्ट्रवादी काँग्रेस
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची दहीगाव सिंचन योजना मागिल पाच वर्षात माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सक्षमपणे चालवलेली आहे. याशिवाय या योजनेत वाढीव गावांचा समावेश करण्यासह या योजनेला सुधारीत मंजुरी मिळवुन कॅनाल अस्तरीकरणाची कामे याशिवाय, टेलला असणाऱ्या गावांना बंद नलिकेतून पाणी योजना मंजुर करून कामही प्रगतीपथावर होते. ज्यामुळे करमाळाच्या पुर्व भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे शेतीला शाश्वत पाण्याचे नियोजन होणार होते. परंतु सत्ता मिळविण्यासाठी पाटील गटासह तालुक्यातील प्रमुख गटांनी साटेलोटे करून आपली दुकानदारी बंद होऊ नये म्हणुन तसेच जनतेची आणि कार्यकर्त्यांची दिशाभुल करून फक्त सक्षम नेतृत्व असणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना रोखण्यासाठी कुणी कुणी पॅच अप केले हे जनतेला माहीत आहे. विशेषतः एवढे पॅच अप करून सुद्धा माजी आमदार संजयमामा शिंदे गटाची ताकद वाढतेय हे निवडणुक निकालातून सिद्धच झाले आहे. निवडणुका हरल्या तरी शिंदे गटाची ताकद वाढली आहे हे विरोधकांच्या लक्षात आले आहे. त्यातच आता सत्तेमुळे पाटील गटावर जनतेची विकासकामे आणि आदिनाथ कारखाना चालवण्याची दुहेरी जबाबदारी पडलेली आहे. ही जबाबदारी पुर्ण करण्याऐवजी फक्त बेताल वक्तव्ये करून जनतेची दिशाभुल करण्याचे काम पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर कायमच करत आहेत. करमाळा तालुक्यात ज्यांना माजी आमदार संजयमामांचा तीन हजार कोटींचा विकास दिसत नव्हता तो आता दिसायला लागलेला आहे. याशिवाय निवडणुकी नंतरच्या पहिल्या अधिवेशनात तालुक्याकरीता दमडाही आणता आलेला नाही हे वास्तव आहे. दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला समान न्याय हक्काने शेतीला पाणी मिळाले पाहिजे. टेल पर्यंतच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी मिळाले पाहीजे.या व्यतिरिक्त बंद नलिकेच्या कामाला नाहकपणे विपर्यास करून विरोध करणे, पाईप जाळणे, कंत्राटदारांना दहशत करणे या प्रकाराविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व समविचारी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे मागणीचे निवेदन देऊन आज आंदोलन केले होते. आज सर्वत्र लग्नसराईमुळे भागातील लोक व्यस्त होते तरी देखिल आंदोलन यशस्वी झाले. करमाळा तालुक्यात सत्ता नसली तरी कर्मभुमी म्हणुन शिंदे गट कायम कार्यरत रहाणार असलेबाबत माजी आमदार संजयमामांनी विधानसभेच्या पराभवानंतरच आपली भुमिका स्पष्ट केलेली असुन शिंदे गटाच्या वाढत्या जनाधारामुळे घाबरलेल्या विरोधकांनी एकमेकांची डोकी फोडलेली विसरून भ्रष्ट मनोमिलन घडवुन आणलेले आहे. परंतु या भ्रष्ट युत्या अल्पावधीच्या असणार आहेत. केवळ संजयमामांना रोखण्यासाठी व स्वतःचे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी पॅच अप करणारांनी आपआपली स्वतंत्र ताकद सिद्ध करावी.माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे पॅक अप होण्याची स्वप्ने आता कधीच पाहु नये.आगामी सर्व निवडणुका देखिल संजयमामा शिंदे गट पुर्ण ताकदीने लढवणार असुन,शिंदे गटाचा प्रत्येक कार्यकर्ता माजी आमदार संजयमामांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन करमाळा मतदार संघातील जनसामान्यांसाठी कायम अग्रेसर राहणार आहेत.त्यामुळे प्रवक्ते तळेकरांनी काही तरी चुकीची वक्तव्ये करण्याचे टाळावे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी प्रतिक्रिया देताना मांडले आहे.