
करमाळा प्रतिनिधी
आदिनाथला कोण काढणार अडचणीतून याबाबतचे प्रसिद्धी पत्रक आदिनाथचे सभासद दत्तोबा गिरमकर यांनी दिले आहे.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक जाहीर झाली असून ; उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे जवळजवळ 272 जणांचे अर्ज हे मंजूर झालेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांनी त्यांचे काम

सोपे करून सर्वच नेते मंडळींची अडचण वाढवलेली आहे. त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी शेअर्स थक बाकीदार, सोसायटी थकबाकीदार यांचा काही विचार केला नाही. 2 एप्रिल पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तोपर्यंत तरी अर्जदाराने आदिनाथ कारखान्यावर जाऊन गव्हाणे पासून गोडाऊन पर्यंत व्यवस्थित नीट नेटकी पाहणी करावी, गव्हाणे जवळ बैलगाड्यांची काय परिस्थिती आहे ? गीरगाय किती दिवसापासून त्याचे राहणे आहे त्याचे भाडे कोण घेते ? मिलची परिस्थिती, बॉयलरची परिस्थिती, को जनरेशन स्टोअर, गोडाऊन, गोडाऊन चे पत्रे, गोडाऊन समोर भंगार इत्यादी गोष्टी कशा आहेत त्या जरूर पाहाव्यात. उजनीहून आणलेली पाईपलाईन अपूर्ण किती आहे, खाली पडलेली साखर पाक होऊन त्याची माती झालेली आहे का ? येथे लाईट बिल पाणीपट्टी थकलेली आहे.

वरील सर्व गोष्टींची जरूर पाहणी करून घ्यावी त्याचबरोबर कारखान्यावर किती कर्ज आहे, कर्मचारी पगार किती, बोगस कर्मचारी कोठे कोठे आहेत, इ. गोष्टीचा अभ्यास करून फॉर्म ठेवावा का ? काढावा याचा विचार जरूर करावा.
मनापासून चांगल्या भावनेने सकारात्मक विचाराने न भांडता न चोऱ्या मोऱ्या करता एक विचाराने काम करावयाच्या असल्यास जरूर फॉर्म ठेवावा आदिनाथ कारखान्याचे व सभासदाचे कल्याण होईल. शेवटी सभासदच कारखान्याचे खरे मालक आहेत. त्यांनीच पूर्णविचाराने मतदानात कौल द्यावा. राजकारण गट तट न पाहता योग्य निर्णय घ्यावा असे आदिनाथ सभासद दत्तोबा गिरमकर यांनी सांगितले आहे.