
करमाळा प्रतिनिधी
आपण आपले काम प्रामाणिकपणे करावे याची दखल कधी ना कधी घेतली जाते असे मत पुरस्कार बहाल करताना गिरिजा मस्के यांनी मांडले. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांचा सन्मान ओम महिला मंडळाद्वारे करण्यात आला. असे पुरस्कार समाजासाठी प्रेरणादायी ठरतात असे मत पुरस्कार बहाल करताना डॉक्टर अपर्णा भोसले यांनी मांडले. डॉ.वर्षा करंजकर व डॉ. कविता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुमित्रा अक्का घोलप (राजकारण क्षेत्र), अलका कलढोणे (शैक्षणिक क्षेत्र), रेखा कटारिया (उद्योग क्षेत्र), मंजुश्री मुसळे (अबॅकस क्लास शिक्षण क्षेत्र), सुनिता भोसले (आरोग्य विभाग), डॉक्टर रेश्मा भांबळ (वैद्यकीय क्षेत्र), ज्योती सावित्री पुरस्कार जयंत दळवी धनश्री दळवी, जहिरा पठाण (बांगडी व्यवसाय) साडी, मानपत्र, पुष्प, श्रीफळ व पुस्तके देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात मंडळाच्या अध्यक्षा अंजली राठोड श्रीवास्तव म़ंडळाच्या कार्याचा लेखाजोखा मांडत म्हणाल्या की, मोठ्यांना मोठं करण्यासाठी तर सगळेच पुढे येतात. पण बांगडी व्यवसाय करणाऱ्या गृहिणीची दखल कोण घेणार ? म्हणून आम्ही जहिरा पठाण आणि विविध क्षेत्र गाजवणाऱ्या, हि-याचं मोल ठरणा-या महिलांचा सन्मान करत आहोत. आयुष्यातील हा पहिलाच सन्मान आहे असे मत प्रत्येकिने व्यक्त केले.
कलढोणे मॅडम म्हणाल्या की, अभिनंदनाचा मैसेज, नंतर फोन हे एकदम अचानक घडले. अगदी मी भावूक झाले. सेवानिवृत्तीनंतर ही कोणी माझ्या कारकिर्दीची दखल घेईल असे वाटले नव्हते.
सत्काराला उत्तर देताना मंजुश्री मुसळे म्हणाल्या, अचानक अशा गोड बातमीने गहिवरून आले. सगळ्या जातीधर्माला धरून असलेला हा सन्मान अगदी मोठा ठरतो आहे. पैसे देऊन पुरस्कार बहाल केले जातात पण कार्याची पारख करून पुरस्कार देणारी संस्था म्हणजे महिलांनी एकत्रितपणे चालवलेले ओम महिला मंडळ होय.
ज्योती सावित्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या धनश्री दळवी आणि जयंत दळवी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहालयाच्या धनश्री म्हणाल्या की, समाजात आपण कुठल्या आणि कशा पद्धतीने काम करतो. त्याची एक ओळख समाजात उतरत असते. त्याची पावती अशा पुरस्काराने मिळते. कार्य करण्याची एक उर्मी मिळते. आज आमच्या दोघांच्या कार्याची दखल घेत ओम महिला मंडळांनी आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केले म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार.
सदर कार्यक्रमात महिलांनी विविध वेशभूषा सादरीकरण करून प्रेक्षक महिलांची मने जिंकली बार्बी – डॉ. मनीषा शिंदे, माँसाहेब जिजाऊ – लक्ष्मी कटारिया, राजस्थानी वेशभूषा – अमृता परदेशी, डॉ.आनंदीबाई जोशी – अस्मिता पा़ंढरे, सीतामय्या- शुभांगी खळदकर, राधा राणी – वीणादेवी, डॉक्टर मोमिता – सारिका पुराणिक, लता मंगेशकर – मंजू जोशी, अशा विविध वेशभूषेतून बलात्कार सारख्या प्रश्नावर महिलांनी आपल्या अभिनयातून प्रकाश टाकला. जयश्रीताई वीर, रेशमा जाधव, पल्लवी निंबाळकर, मितवा अग्रवाल यांनी स्वागत गीत सादर केले. विनोदी अभिनयातून सूत्रसंचालन ज्योती पांढरे व पुष्पा लुंकड यांनी केले. सदर कार्यक्रमास जगदिश अग्रवाल, जगदिश शिगची, बलराज परदेशी यांनी मोलाचे योगदान केले. आभार लक्ष्मी कटारिया यांनी मानले.







