करमाळा प्रतिनिधी

आदिनाथ कारखाना सुरु होऊन ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना न्याय मिळावा अशी इच्छा आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केली. जेऊर ता. करमाळा येथील आयोजित विकासकामे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शहाजीराव‌ देशमुख, राजेंद्रसिंह राजेभोसले, प्राचार्य जयप्रकाश बिले, नवनाथ झोळ, डॉ.हरिदास केवारे, सभापती अतुलभाऊ पाटील, प.स. सदस्य राहुल सावंत, जि.प. सदस्य बिभीषण आवटे, सुखलाल लुणावत वकील, रविबुआ कोकरे, देवानंद बागल,

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, राजाभाऊ कदम, डॉ. अमोल घाडगे, संजय गुटाळ, बापुराव रणसिंग, किरण कवडे, बाळासाहेब पवार, विठ्ठल शिंदे, संतोष खाटमोडे पाटील, बप्पा पाटील, संजय जाधव, गहिनीनाथ ननवरे, विकास गलांडे, पंडीत वळेकर,अमरजित साळुंखे आदि उपस्थित होते. आमदार नारायण आबा पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेऊन शंभर दिवस झाले याबद्दल तसेच आगामी पाच वर्षांत करावयाच्या विकास कामाबाबत चर्चा झाली. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, दहिगाव उपसा सिंचन योजना पुर्ण क्षमतेने चालवून सर्वच लाभक्षेत्रात पाणी पोहचवण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूरी व कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

आदिनाथ कारखाना हा परत एकदा सुरु होऊन पुर्ण क्षमतेने यातुन गाळप झाले पाहिजे या करीता आता आगामी निवडणुकीत सभासद आपली भुमिका चांगल्या रितीने पार पाडतील असा आशावाद आमदार नारायण आबा पाटील यांनी व्यक्त केला. तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो सभासद‌ हिताचा निर्णय आपण घेणार असल्याचे सुचक वक्तव्य सुध्दा आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या येत्या काही दिवसांत येणाऱ्या निवडणुकीपुर्वी आमदार नारायण आबा पाटील यांनी एका आढावा बैठकीत केलेले हे‌ वक्तव्य महत्त्वाचे व अर्थपूर्ण मानले जात आहे. आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असता आमदार नारायण आबा पाटील गटाकडून मात्र निवडणुक पुर्व‌तयारी सुरु झाली आहे. सभासद मतदार यादी प्राप्त करुन त्याची छाणणी व‌ नियोजन‌ करण्यास सुरुवात केली गेली आहे. या बैठकीत आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, माजी संचालक नवनाथ झोळ यांनी आपली मते भाषणातुन मांडली तर पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव सरक यांनी संभाव्य निवडुकीच्या निवडणुक प्रक्रियेची माहिती दिली. प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य करत असताना जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे नेतृत्व म्हणून जनता आता समाधान व्यक्त करत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले तर बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल यांनी आभार मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *