
करमाळा प्रतिनिधी
करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ या स्पर्धेच्या बक्षीस सोहळ्याचे आयोजन दि.२९ जाने.२०२५ रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव २०२४ मध्ये करमाळा शहर व तालुक्यातील गणेश मंडळानी सामाजिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक सलोखा राखून कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्या गणेश मंडळांना करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने सन्मानित करून गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये करमाळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली यांना पहिला क्रमांक मिळाला असून त्या मंडळास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तर द्वितीय क्रमांक राशीन पेठ तरुण मंडळ व तृतीय क्रमांक लोकमान्य टिळक तरुण मंडळ, किल्ला विभाग या मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यानंतर विशेष गौरव म्हणून सामाजिक सलोखा राखल्या बद्दल सरकार मित्र मंडळ करमाळा, जामा मस्जिद करमाळा जमीर कासम सय्यद यांचाही विशेष गौरव म्हणून सन्मानित करण्यात आले.
यावेळी करमाळा ग्रामीण बीट मधील भैरवनाथ तरुण मंडळ (वाशिंबे), विघ्नहर्ता गणेश मंडळ (सावडी) व मोरया तरुण मंडळ (कोंढार-चिंचोली) तसेच केम बीट येथील टिळक मित्र मंडळ व्यापार पेठ (केम), शिव प्रतिष्ठान (केम) व शिव शंभो मित्र मंडळ (शेलगाव) तसेच कोर्टी-रावगाव बीट येथील शिव गणेश मित्र मंडळ(कोर्टी), जय बजरंग तरुण मंडळ(मांगी), राजमाता ग्रुप (हिवरवाडी) व साडे-पांडे बीट येथील पैलवान ग्रुप (सालसे), शिवसाम्राज्य युवा प्रतिष्ठान (फिसरे) व जय भवानी तरुण मंडळ (कोळगाव) आणि जेऊर बीट येथील अष्टविनायक मित्र मंडळ (जेऊर), जय भवानी तरुण मंडळ (उमरड) व काळभैरवनाथ गणेश मित्र मंडळ (कोंढेज) येथील सर्व गणेशोत्सव मंडळांना करमाळा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने सन्मानित करून गौरविण्यात आले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून संदीप शिंदे-पाटील, प्रा.लक्ष्मण राख, ऍड.अपर्णा शिंदे-पद्माले, प्रदीप सुभाष बलदोटा व अशोक मुरूमकर यांनी परीक्षकाचे कार्य उत्तमरित्या पार पाडले. त्यांचाही सन्मान उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रियांका आंबेकर (उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग, कुर्डुवाडी), शिल्पा ठोकडे (तहसीलदार, करमाळा), गजानन गुंजकर (वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रुग्णालय करमाळा), अमित कदम (गटविकास पंचायत समिती), सचिन तापसे (मुख्यअधिकारी, नगरपरिषद, करमाळा), अभिषेक पवार (उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा), उमेश बेंढारी (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करमाळा), प्रिया पाटील (अधीक्षक,भूमी अभिलेख कार्यालय,करमाळा) हे उपस्थित होते.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजित पाटील (उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा, उपविभाग करमाळा) तसेच कार्यक्रमाचे आयोजन विनोद घुगे (पोलीस निरीक्षक, करमाळा) यांच्या वतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश दळवी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संदीप शिंदे-पाटील,तालुकाध्यक्ष,पोलीस पाटील संघ, करमाळा यांनी केले.