
करमाळा प्रतिनिधी
जेऊर येथे सर्व सुविधा युक्त ट्रामा केअर सेंटर उभा करावे अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे कडे केली आहे. मुंबई येथे प्रत्यक्षात राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी भेट घेतली आणि मतदार संघातील आरोग्यविषयक समस्या मांडल्या. यावेळी त्यांनी मतदार संघातील प्राथमिक, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त कर्मचारी पदाची

माहिती दिली व लवकर कर्मचारी तथा वैद्यकीय अधिकारी नेमण्याबाबत विनंती केली. तसेच यावेळी जेऊर येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे अशी मागणी केली. मंत्रिमहोदय यांचे समोर वस्तुस्थिती मांडताना आमदार पाटील यांनी सांगितले की, अहिल्यानगर (अहमदनगर)-पंढरपूर हा रस्ता करमाळा मतदार संघातून जातं असून प्रवाशी तसेच प्रत्यक्षात करमाळा

मतदार संघातील नागरिक यांच्या आरोग्य सुविधा व उपचारासाठी सध्या एकही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. या विदर्भ, खान्देश यांना दक्षिण भारतास जोडताना आमच्या करमाळा मतदार संघातून रस्ता जातो. मोठ्या प्रमाणावर पर्यटक तसेच मालवाहतूक वाहनाची वर्दळ या भागातून होते. त्यानुसार अनेकदा अपघातही घडतात. यामुळे प्रवाशी तसेच नागरिक यांचेवर वेळीच उपचार करण्यासाठी जेऊर ता. करमाळा येथे ट्रामा केअर सेंटर उभारणे गरजेचे असल्याचे आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या प्रश्नावर प्रत्यक्ष चर्चा तर केलीच परंतु लेखी निवेदनही सादर केले. यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निवेदनावर शेरा मारला. यात मंत्रिमहोदय यांनी आरोग्य राज्य सचिव यांना प्रत्यक्षात माहिती घेऊन व तपासून अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य विभागातील करमाळा मतदार संघातील रिक्त पदे भरण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले.