सोलापूर, दि. 27 (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 जानेवारी 2025 दिल्ली येथे होणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील युवांनी राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉगसाठी माय भारत पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माण कार्यामध्ये सहभागी करून राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग अंतर्गत विविध संकल्पना निश्चित करण्यात आल्या आहेत.
प्रथम टप्प्यात विकसित भारत क्विझमध्ये वैयक्तिकरित्या स्पर्धकांना सहभागी होता येईल. प्रश्न मंजुषा स्पर्धा, सामान्यज्ञान व भारताची कामगिरी या बाबींवर ही स्पर्धा होणार आहे. यासाठी माय भारत पोर्टलवर शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवावा. या स्पर्धा दि. 25 नोव्हेंबर 5 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.
व्दितीय टप्प्यात विकसित भारत यावर निबंध लेखन स्पर्धा घेतली जाईल. यामध्ये शब्द मर्यादा 1000 शब्दाची राहील, प्रथम टप्यात सहभागी होवून निवड झालेल्या युवांचा यामध्ये सहभाग राहील. निबंध स्पर्धा ऑन लाईन पध्दतीने दि. 8 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.
तृतीय टप्प्यात विकसित भारत पीपीटी चॅलेंजवर निर्धारित विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातून 4 युवांची निवड करण्यात येणार आहे. दि 20 ते 26 डिसेंबर कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
चतुर्थ टप्प्यात राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना दि. 11 जानेवारी 2025 रोजी सादरीकरण करावे लागेल. जिल्ह्यातील 15 ते 29 वर्षाआतील युवक व युवतींनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.