करमाळा प्रतिनिधी

गेल्या ३-४ वर्षात,राजुरी गावच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत ज्यांचा वाटा आहे अशा आपल्याला सहवास  लाभलेल्या बऱ्याच व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्या. यातच परवा अजातशत्रू व्यक्तीमत्व साखरे सरांच्या जाण्याने तर समस्त ग्रामस्थांच्या मनाला चुटपूट लागून राहिली.

एक भाऊ,पती, पिता, आजोबा गेले याबरोबरच पंचक्रोशीतील एक  कर्मयोगी गेला ही खूप मोठी आणि कधीही न भरून येणारी सामाजिक हानी आहे. साखरे सरांनी प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानार्जन करून पंचक्रोशीतील माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना सहजपणे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात अत्यंत मोलाची भूमिका पार पाडली. सरांच्या या जडणघडणीत बंधू आप्पा, अण्णा, विजया नानी यांच्या त्याग आणि सहकार्याचे महत्वपूर्ण योगदान आहे. माझ्या दृष्टीने शिक्षणक्षेत्रातील शिकवण्यासाठी सर्वात अवघड विषय म्हणजे भाषा विषय आणि ती भूमिका सरांनी अगदी लीलया पार पाडली. साखरे सर ,मीरा रामनवमीवाले, सत्यपाल श्रीवास्तव ,डॉ. महेंद्र कदम  (यशवंतराव महाविद्यालय ) प्रवीण दवणे( ज्ञानसाधना महाविद्यालय) या मला लाभलेल्या व अनुभवलेल्या विविध भाषा शिक्षकांच्या यादीत सर्वोच्च स्थान  सरांना जाते. प्रवास वर्णन, लोककथा, आत्मकथा, निसर्गकविता,व्याकरण यातला कोणताही विषयपाठ असो, सरांच्या अध्यापनाची विशेष हातोटी होती.

संपूर्ण जीवनकाळात सरांनी कमावलेल्या भौतिक संपत्तीत कोणाचीही तळमळ दिसणार नाही. त्या काळात मनात आणले असते  तर कितीही अर्थाजन करू शकले असते इतका समाजमनावर त्यांचा प्रभाव होता पण समाजमनाच्या या विश्वासाला सरांनी कधीही तडा जाऊ दिला नाही. त्यांच्या या  तत्त्वनिष्ठतेचे फळ त्यांच्या पुढील वारसांना नक्कीच मिळेल.

एखाद्या व्यक्तीने संपूर्ण जीवन काळात ज्या गोष्टीचा व्यासंग केला तीच गोष्ट शेवटच्या काही क्षणापर्यंत करावी अगदी तसंच सरांनीपण त्यांच्या  अमोघ वाणीने,  उपस्थितांना ज्ञानदान करूनच आपली जीवनयात्रा संपवली. माझ्या दृष्टीने कोणत्याही तिथीवार आणि मूहूर्तापेक्षा हे मरण उच्च कोटीचे आहे.

महाभारतातील संजय ला जशी दिव्यदृष्टी लाभली त्यायोगे त्याने राजमहालात बसून अंध राजा धृतराष्ट्राला कुरूक्षेत्रावर घडत असलेल्या युद्ध प्रसंगाचे वर्णन, समालोचन केले जणू काय अगदी अशीच दिव्यदृष्टी साखरे सरांनाही अंतीम क्षणी प्राप्त झाली की काय असे सहज मनात आले.

आणि त्या दिव्यदृष्टीच्या आधारेच पृथ्वीलोकात वावरत असताना स्वर्गदेवतेचे आमंत्रण घेऊन आलेल्या दुतांचे अस्तित्व जाणवल्याने सरांनी उपस्थित श्रोत्यांना जीवनाचे अंतिम सार कथन केले आणि मंत्रमुग्ध होवून सर्वांनी त्यांचे श्रवण केले आणि त्या श्रोत्यांसोबतच मलाही सरांचे शेवटचे वक्तृत्व ऐकायला मिळाले हे माझे परमभाग्यच!!!

        सरांच्या या आकस्मिक निधनामुळे विजया नानी, कन्या माई,स्वाती,राणी, सर्व जावई, सुपूत्र धनंजय सर व समस्त साखरे कुटुंबाला हे डोंगराएवढं दु:ख पचविण्याचे बळ मिळो ही पांडुरंगचरणी प्रार्थना 🙏🏻

तुकाराम देविदास जाधव, राजुरी

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *