नारायण पाटलांनी त्यांच्या कार्यकाळात विजेची नक्की कुठली कामे केली या विषयी खरं बोलावं.
मा.सरपंच दादासाहेब जाधव व नंदकुमार जगताप यांचे आव्हान !
प्रतिनिधी
माजी आमदार नारायण पाटलांनी २०१४ ते २०१९ या त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघातील विजेचे प्रश्न सोडविण्यासाठी नक्की कुठली कामे केली हे जनतेसमोर पुराव्यानिशी मांडावे,उगीच उचलली जीभ अन लावली टाळ्याला ! असले उद्योग करून जनतेची पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये !असे आव्हान रावगावचे माजी सरपंच दादासाहेब जाधव व राजुरीचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांनी दिले आहे.
या विषयी बोलताना जाधव व जगताप म्हणाले की,आमदार संजयमामा शिंदे यांनी आवाटी येथे मंजूर केलेले उपकेंद्र पूर्ण झालेले असून सद्या लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे तर रावगाव व राजुरी येथील उपकेंद्रांचे भूमिपूजन झालेले असून आता आचारसंहिता संपल्यामुळे त्याचे काम सुरू होईल. मामांच्या कार्यकाळात पांडे,कोळगाव,कात्रज,कोर्टी, कवीटगाव,म्हैसगाव, पिंपळनेर,दहीगाव,कुर्डू व कव्हे या १० ठिकाणी उपकेंद्रांची क्षमता ५ M.V.A.ने वाढविण्याचे काम पूर्ण होऊन कार्यान्वित देखील झालेले आहे. बारलोणी ,कुंभेज, वांगी २, जातेगाव,वीट, घोटी,केम,झरे, पोमलवाडी ,उपळवटे यांचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यांना मंजुरी मिळून तीही कामे मार्गी लागतील.त्याचप्रमाणे आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दि.४ नोव्हेंबर २०२२ रोजी पत्र देऊन,समक्ष भेटून व पाठपुरावा करून गौंडरे येथे २२० के.व्ही.चे विजकेंद्र मंजूर होण्याची मागणी केली होती व ती मंजूर देखील झाली परंतु त्यासाठी आवश्यक जमीन तेथे उपलब्ध होत नसल्याने जागेबाबत फेर सर्वेक्षण करण्यात आलेले असून सौंदे येथे त्यासाठी जागा उपलब्ध झालेली आहे व लवकरच तिथे हे केंद्र उभारण्याचे काम सुरू होईल.
ही सगळी वस्तुस्थिती जनतेला ठाऊक असताना सध्या माजी आ.पाटील हे त्यांनी सुरू सध्या केलेल्या गावभेट दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी बोलताना,मी आमदार असताना २०१४ ते२०१९ दरम्यान मतदारसंघात ९ नवीन वीज उपकेंद्रे उभारली,१३ उपकेंद्रांची क्षमता वाढवून घेतली व आता पाठपुरावा करून नवीन उपकेंद्रे उभारणे व क्षमतावाढ करणे अशा १४ प्रस्तावांना मंजुरी मिळवली असून यात लव्हे,करमाळा,मांगी उपकेंद्रांची क्षमता ५ MVA ने वाढवून घेतली वगैरे खूप काही निराधार वक्तव्ये करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या निमित्ताने त्यांनी आमदार असताना व त्यानंतर वीज उपकेंद्रांची मंजुरी,क्षमतावाढ ही कामे मंजूर करून घेतली व मार्गी लावली हे पुराव्यानिशी दाखवून द्यावे व सिद्ध करावे असे खुले आव्हान जाधव व जगताप यांनी माजी आ. पाटील यांना दिले आहे.