
करमाळा प्रतिनिधी
उजनी धरणात वादळी वाऱ्यात बोट उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्या सहाजणांचे ३६ तासानंतर पाण्यात तरंगताना मृतदेह सापडले. त्यानंतर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांवर कुगाव व चौघांवर झरेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपुर्ण करमाळा तालुका दुःखात बुडाला असून सर्वत्र या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी प्रियंका अंबेकर व तहसीलदार शिल्पा ठोकडे उपजिल्हा रुग्णालय व कुगाव येथे उपस्थित होते. करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर व डॉ. राहुल कोळेकर व करमाळा पोलिस यांनी शासकीय प्रक्रिया पूर्ण केली.

उजनी जलाशयात मंगळवारी (ता. २१) सायंकाळी कुगाव येथून कळशीकडे जाणारी प्रवासी बोट उलटली होती. वादळी वाऱ्याने उलटल्या या बोटीत चालकासह सातजण होते. त्यातील एकजण पोहत बाहेर आला होता. त्यानंतर बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा शोध एनडीएफचे पथक व मच्छीमारांची बोटने तपास सुरु होता. दरम्यान अनुराग ज्ञानदेव अवघडे (वय २८ बोट चालक), आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचे चिरंजीव गौरव धनंजय डोंगरे (वय २४, दोघे रा. कुगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), गोकुळ जाधव (वय ३०), कोमल गोकुळ जाधव (वय २५), माही गोकुळ जाधव (वय ३) व शुभम गोकुळ जाधव (दिड वर्ष, सर्व रा. झरे, ता करमाळा) यांचे मृतदेह सापडले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून चौघांवर झरेत तर दोघांवर कुगावामध्ये अंत्यसंस्कार झाले.

झरे येथे जाधव परिवारातील चौघांना एकाच सरणावर भाऊ हनुमंत यांनी अग्नी दिला. त्यांना मराठी शाळेच्या मागे असलेल्या स्मशानभूमीत नेले. एकाजवळ वडील व मुलगा तर दुसऱ्याजवळ आई व मुलगी होती. एकाच सरणांवर त्या चौघांवरही शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुगाव येथे अवघडे यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. तर डोंगरे यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार झाले. प्रथम अवघडे यांच्यावर तर व नंतर डोंगरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दोन्हीही अंत्यसंस्कारावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
