
करमाळा प्रतिनिधी
मागील आठवड्यापासून मान्सूनपूर्व पाऊस वादळी वाऱ्यासह भाग बदलत करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या गावात पडत आहे. तसे पाहिले तर पाऊस कमी अन् वादळी वारा जास्त अशी परिस्थिती आहे. एकतर दुष्काळी परिस्थिती असताना देखील

शेतकऱ्यांनी केळी सारखी पिके लाखो रूपये खर्च करून तळहाताच्या फोडा प्रमाणे सांभाळली आहेत. आता कुठं पाऊस पडेल मग पिक अधिक जोमाने वाढेल अन् निर्यातक्षम केळी पिकून चांगले पैसे मिळतील या आशेत असलेल्या बळीराजाचे आजच्या

पावसाने स्वप्न दुभंगले आहे. कारण आख्खी केळी काही मिनीटाच्या पाऊस अन् वाऱ्यात जमिनदोस्त होवून उजनी धरणाच्या परिसरातील कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. करमाळा तालुक्यातील उजनी धरणाचा पट्टा केळी उत्पादनामुळे

नावारूपाला येवून सोलापूर जिल्ह्याचे नाव जगभरात झाले आहे. यामुळे येथिल शेतकऱ्यांना मागील काही वर्षांपासून केळीचे चांगले पैसे मिळाल्यामूळे उत्साह वाढलेला आहे, काही शेतकऱ्यांनी तर नव-नवीन वाणांचे प्रयोग केले आहेत. मात्र क्षणार्धात

वादळी वाऱ्यासह पावसाने होत्याचं नव्हतं केलं आहे अशा परिस्थीतीत जर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही मिळाली तर बळीराजा केळी पिक पिकवण्याचे धाडस करणार नाही म्हणून बळीराजाला प्रशासनाने जबाबदारीने भूईसपाट झालेल्या केळी व इतर पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई म्हणून मदत करावी असे आवाहन युवानेते भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केले आहे. त्यांनी या भागात प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे. जर प्रशासनाने तात्काळ पंचनामे नाही केले तर आपण बळीराजासाठी रस्त्यावर उतरू व शासनाला पंचनामे करण्यासाठी भाग पाडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.