सोलापूर दि. १७ (जि.मा.का.) : अपंग बालकांसाठी मोफत शिक्षण, वसतीगृह व गरजेनुसार अस्थिव्यंगोपचार शस्त्रक्रिया व कृत्रिम अवयव पुरविण्याची सुविधा पुरविणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय निवासी संस्था मिरज येथे कार्यरत असून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, शासकीय अपंग बाल गृह व शाळा, मिरज यांनी केले आहे.

                संस्थेच्या परिसरात पहिली ते चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण, पाचवी पासून पुढील शिक्षण माध्यमिक शाळेमार्फत, शाळेत जाण्या-येण्याकरीता वाहतूक सुविधा, पाठ्यपुस्तके, वह्या इतर शैक्षणिक साहित्य व शालेय गणवेश, मुलींसाठी विशेष काळजी घेण्यासाठी महिला काळजी वाहक आदी सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. वसतिगृहात अपंग मुला-मुलींची स्वतंत्र निवास व्यवस्था, मोफत जेवण, प्रत्येक विद्यार्थ्यास कॉट, गादी, बिछाना व इतर साहित्यांचा पुरवठा, आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय, शुध्द व थंडगार पाण्याची सुविधा तसेच अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया व भौतिकोपचाराची सुविधा, गरजेनुसार कृत्रिम अवयव कुबड्या, तीन चाकी सायकलीचे वाटप या सर्व सुविधा संस्थेमार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.

             येथील प्रवेशासाठी प्रवेशित व्यक्ती अस्थिव्यंग असावी. ती व्यक्ती ६ ते १४ वर्षे या वयोगटातील असावी. अर्जासोबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेला अपंगत्वाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.

        अधिक माहितीसाठी  अधीक्षक, शासकीय अपंग बालगृह व शाळा, किल्ला भाग, बी.एस.एन. एल. ऑफिस शेजारी, मिरज-४१६४१०. संपर्क क्र. ०२३३-२२२२५१३, मोबा.क्र.९४२२२१६४५९, ९५५२०९७२४१ या नंबरवर संपर्क साधावा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *