
सोलापूर दि.17 (जिमाका) :- जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत सन 2024-25 मध्ये इयत्ता पहिली व इयत्ता दुसरीमध्ये मोफत प्रवेशासाठी जास्तीत-जास्त इच्छूक पालकांनी 31 मे 2024 पर्यंत परिपुर्ण अर्ज सादर करावेत असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. इयत्ता पहिली करीता विद्यार्थ्याचे वय दि. 31 डिसेंबर, 2024 पर्यत 6 वर्षे पुर्ण असावे. इयत्ता 2 री करीता विद्यार्थ्यांचे इयत्ता 1 लीचे गुणपत्रक अथवा बोनाफाईड असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापर्यंत असावे. अनुसुचित जमातीच्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, उत्पन्न दाखला आदी प्रती सादर कराव्यात. विद्यार्थ्याच्या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, जन्मतारखेसाठी ग्रामसेवकाचा दाखला अथवा अंगणवाडीचा दाखला जोडण्यात यावा. विद्यार्थ्याच्या व पालकाच्या आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत. विद्यार्थ्यांचे पालकांनी खोटी माहिती सादर केल्यास पाल्यांचा प्रवेश रद्द केला जाईल. सदर योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चीती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकांच्या अथवा पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही.

अधिक माहितीसाठी. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर दक्षिण सोलापूर तहसिल कार्यालयाच्या वरील मजल्यावर, सिध्देश्वर पेठ, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार सोलापूर तसेच प्र. कनिष्ठ विस्तार अधिकारी व्ही.वाय. सरतापे ( मो. नं. 8668774254 ) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही एकात्मिक आदिवासी विकासचे प्रकल्प अधिकारी श्री झाकर्डे यांनी केले आहे
