
विशेष वृत्त क्र. 3
मतदान केंद्रावर मिळालेल्या सुविधा बद्दल मतदारांकडून जिल्हा प्रशासनाचे कौतुक
जिल्ह्यातील 3 हजार 617 मतदान केंद्रावर मतदारांसाठी सर्व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद त्यांनी स्वतः लक्ष घातले व अनेक मतदान केंद्रावर भेट देऊन सुविधांची पाहणी केली.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी बोरामणी येथून मतदान केंद्र परिसर स्वच्छते मोहिमेचा शुभारंभ केला होता
सोलापूर, दिनांक 8 (जिमाका) :- नुकत्याच तिसऱ्या टप्प्यात झालेल्या 42 सोलापूर लोकसभा व 43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारासाठी विशेषता दिव्यांग, जेष्ठ नागरिक आजारी असलेले मतदार आणि नव युवा मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी मतदानाच्या टक्केवारी थोडीशी वाढ झालेली दिसून आली.

मंडपाची व्यवस्था : जिल्ह्याचे वाढत असलेले तापमान पाहता प्रशासनाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यकतेप्रमाणे मतदारांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून मंडपाच्या सावलीमध्ये रांगेत उभे राहून वयोवृद्ध, रुग्ण आणि महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील.
जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असताना देखील मतदारांना प्रशासनाकडून स्वच्छ आणि ग्लुकोज युक्त पाण्याची व्यवस्था : सध्या जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही ग्रामीण भागासह शहरातील सर्व मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी प्रशासनाकडून स्वच्छ आणि ग्लुकोज युक्त पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधेमुळे अनेक मतदार केंद्रावरील मतदारांनी समाधान व्यक्त केले.

महिला व लहान बालकांसाठी विशेष सहायता कक्ष : मतदान केंद्रावर लहान बाळासहित येणाऱ्या महिला मतदारांसाठी संबंधित महिला मतदान करेपर्यंत त्यांच्या बाळासोबत खेळण्यासाठी व त्याचा सांभाळ करण्यासाठी तात्पुरते पाळणाघर उभारण्यात आले होते याची जबाबदारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना देण्यात आली होती.
स्वच्छतागृहा ची खास सोय : प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती ज्या ठिकाणी स्वच्छतागृह व्यवस्थित नसेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्र व मतदान केंद्राचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून दिनांक एक मे ते सहा मे 2024 या कालावधीत सर्व 3617 मतदान केंद्रावर अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर स्वच्छता पाहून मतदार ही मतदानाच्या रांगेत उभा राहिला तरी त्यांना कोणताही त्रास झाला नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मतदान केंद्र व परिसराची स्वच्छता मोहीम सुरू केली होती.
प्राथमिक आरोग्याची सुविधा : मतदान करताना एखाद्या व्यक्तीला अचानक काही आरोग्याची समस्या उद्भवली तर त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच ॲम्बुलन्स ची व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात आली होती.
व्हील चेअर व रॅम्प ची सुविधा : मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग, वयोवृद्ध आणि रुग्ण मतदारांच्या सहायतेसाठी स्वयंसेवक आणि व्हील चेअर ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सर्व मतदान केंद्रावर व्हीलचेअर घेऊन जाण्यासाठी रॅम्प बनवण्यात आलेले होते. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता व्यवस्थितरित्या ते मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क उत्साहाने व आनंदाने बजावा, हा उद्देश होता व तो सफल ही झाला.
मतदारांचे नाव शोधण्यासाठी मतदार सहायता कक्ष : मतदार यादी मध्ये नाव शोधण्यासाठी आणि मतदान कक्षामध्ये जाऊन मतदान व्यवस्थितरीत्या करता यावे याकरिता प्रशासनाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष उभारण्यात आले होते या कक्षाची जबाबदारी बूथ लेवल ऑफिसर आणि स्वयंसेवकांची होती. या कक्षाच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराचे नाव शोधून देऊन त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मदत करण्यात येत होते.
हिरकणी कक्ष : प्रत्येक मतदान केंद्रावर अनेक कक्षाची स्थापना करण्यात आली होती या कक्षामध्ये स्तनदा माता यांच्यासाठी व त्यांच्या लहान बाळासाठी सुविधा देण्यात आलेल्या होत्या.
आदर्श मतदान केंद्र : प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात 22 आदर्श मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेले होते.
युवा मतदान केंद्र : प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात दोन याप्रमाणे जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात 22 युवा मतदान केंद्र निर्माण करून युवा नव मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्याचा प्रशासनाचा चांगला प्रयत्न होता.
दिव्यांग मतदान केंद्र : दिव्यांग कर्मचाऱ्यामार्फत चालवले जाणारे एक केंद्र प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आले होते जिल्ह्यात एकूण 11 दिव्यांग मतदान केंद्र निर्माण केले होते.
मतदारांच्या मदतीसाठी स्वंयसेवक : जिल्ह्यातील 3617 मतदान केंद्रावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची स्वयंसेवकाची फौज निर्माण करण्यात आली होती. हे स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, रुग्ण मतदार यांना मतदार केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी मदत करत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या उत्सवात सहभागी करून त्यांना हा उत्सव प्रत्यक्ष पाहणे व भविष्यातील लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांच्या सहभाग घेणे असा उद्देश होता.
मोबाईल हेल्थ टीम : मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी तसेच मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आरोग्याची समस्या निर्माण झाल्यास 60 मोबाईल हेल्थ टीम आरोग्य साहित्यासह तयार ठेवण्यात आलेल्या होत्या.
महिला, युवा आणि रुग्ण मतदारांच्या प्रतिक्रिया *
महिला मतदार : महिलांसाठी खूप छान आदर्श महिला केंद्र उभारण्यात आलेले आहे या केंद्राची वेगवेगळ्या रंगाच्या फुग्यांनी केलेली सजावट प्रत्येकांना आकर्षित करत आहे. या ठिकाणी येऊन मतदान करण्याचा एक विलक्षण आनंद आम्हाला मिळाला आहे. उत्कृष्ट नियोजन,परिपूर्ण व्यवस्था, मंडप, पिण्याचे पाणी आदी सुविधा आमच्यासाठी उपलब्ध केल्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार.
युवा नव मतदार : मतदान केंद्रावर मतदानासाठी महिलांना प्रथम प्राधान्य दिले.उन्हाचा जास्त त्रास होऊ नये याकरता वयोवृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर ची सुविधा देत होत. आणि सर्व अधिकारी आणि कर्मचारी नम्रपणे सहकार्य करत होते.आमच्यासारख्या नव युवा मतदारांसाठी हा एक वेगळा आणि आठवणीत राहणारा प्रसंग होता.
रुग्ण मतदार : माझ्यासारख्या रुग्ण मतदारांसाठी व्हीलचेअर आणि स्वयंसेवकाची खूप खूप छान व्यवस्था करण्यात आली होती. केंद्रावरील पोलीस सुरक्षा, ग्लुकोजचे पाणी मंडपाची व्यवस्था एकदम चोख होती.अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
दत्तात्रय राठोड (लमाण तांडा बालाजी नगर)
नागरिकांसाठी मतदान केंद्रावर मंडपाची व्यवस्था, फिल्टर व ग्लूकोज युक्त पाणी आणि रेड कार्पेट यांसारख्या अनेक सुविधा दिलेल्या आहेत. मी प्रत्येकांना आवाहन करतो की त्यांनी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर यावे.
कडक असाह्य असलेल्या उन्हात मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी व अन्य प्रशासकीय यंत्रणा कडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी होणे व मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन केले होते. प्रशासनाच्या या नियोजनामुळे अनेक मतदारांना मतदान करताना या सुविधांचा लाभ घेता आला त्यामुळे मतदारांकडून प्रशासनाच्या या कामाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.