करमाळा प्रतिनिधी

काल दि.१७ मार्च रोजी सकाळी आठच्या सुमारास कॉलेज ग्राउंडवर एक हेलिकॉप्टर गुपचूप उतरले आणि त्यातून अवतरलेले महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तातडीने थेट उंदरगावाकडे प्रयाण केले…ते कशासाठी तर तेथे

स्थित असलेल्या ज्याच्यावर काही वर्षांपूर्वी फसवणूक, विनयभंग,बलात्कार आदी तक्रारींमुळे गुन्हे दाखल झाले होते आणि जो भोंदू बुवा त्यामुळे काही महिने करमाळा पोलीस ठाण्याच्या कोठडीत पाहुणचार घेत होता त्याची भेट घेऊन आपल्या राजकीय भवितव्यासाठी त्या लबाड मनोहरमामाची भेट घेऊन त्याचे कृपाशीर्वाद घेण्यासाठी?

नक्की काय गौडबंगाल लपलेले आहे यामागे ? जे लोढा हे बलाढ्य बिल्डर असल्याचं आणि त्यांची या धंद्यात डोनाल्ड ट्रम्पशी भागी असल्याचं बोललं जातं त्या लोढा यांनी आज गुपचूप येऊन मन्याची भेट कशासाठी घेतली असावी ? बरं सदिच्छा भेट म्हंटलं तर ती किती वेळ असते ? तास, अर्धा तास…पण मिळालेल्या माहितीनुसार दुपारी अडीच वाजेपर्यंत तरी लोढा हे

मन्याच्या आश्रमात त्याच्या कृपाछायेखालीच थांबलेले होते म्हणे. दरम्यान त्यांनी भाड्याने आणलेले हेलिकॉप्टर ठरलेली वेळ संपल्याने लोढाना न घेताच उडून माघारीही गेलं म्हणे ! आता मग यातून नक्की काय अर्थ काढायचा, आणि विशेष म्हणजे भाजपचा राज्याचा एक कॅबिनेट मंत्री करमाळ्यात लँड होतो…एका भोंदू बुवाला भेटायला जातो आणि याची कानोकान खबर भाजपच्या स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मिळू नये अशी गुप्तता पाळण्यात येते तर मग याचा नक्की अर्थ काय समजायचा ?

तर मग लोढा भोंदू मन्याकडे का आणि कशासाठी आले होते आणि इतका वेळ थांबून ते तिथं नक्की काय करत होते ? कृपादृष्टी लाभावी, साक्षात्कार व्हावा म्हणून मन्याचे पाय चेपत बसले होते की ब्लॅक मनीची विल्हेवाट मन्याच्या मार्फत लावण्यासाठी सोबत ब्लॅक मनी घेऊन आले होते ? की भाजपची पुन्हा सत्ता यावी,आपण पुन्हा निवडून यावं यासाठी मन्याच्या सांगण्यानुसार जपजाप्य, अनुष्ठान, होमहवन करत बसले होते ?

तात्पर्य लोढा यांच्या या “मनोहर”भेटीची योग्य त्या सक्षम यंत्रणेमार्फत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मन्याच्या उंदरगाव, घोटी येथील आश्रमांची झाडाझडती तात्काळ घेणे गरजेचे आहे व या भेटीत काही आर्थिक (ब्लॅक मनी विल्हेवाट) घडले असेल तर तेही उघडकीस येणे आवश्यक आहे. आणि जर लोढा हे केवळ मन्याच्या कृपादृष्टीसाठीच आले असतील तर त्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन समाजातील बुवाबाजी,अंधश्रद्धा,व्यक्तिपूजा आदी प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या लोढा यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी होणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर मन्या सारख्या भोंदू बुवांचे स्तोम दिवसेंदिवस वाढतच जाईल. शिवाय भाजपवर आधीच असलेला जातीय, धर्माधिष्ठित राजकारण करण्याचा असलेला ठपका आणखी ठळक होईल हे नक्की !

विवेक शं. येवले,करमाळा

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *