आमदार शिंदे मा. आमदार पाटील गटाचे आरोप प्रत्यारोप

आ.बबनदादाला उजनीचा अभ्यास करायला सांगणाऱ्या पाटील गटाच्या बालिश बुद्धीच्या प्रवक्त्याला गावातील साध्या नळयोजनेचा तरी अभ्यास आहे का ?

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील माजी आ. नारायण पाटील गटाचे प्रवक्त्ते सुनील तळेकर यांनी माढा तालुक्याचे आमदार व जिल्ह्याचे जेष्ठ नेते बबनदादा शिंदे यांच्यावर टिका करताना त्यांना व आ.संजयमामा शिंदे यांना उजनी धरणाचा अभ्यास नसल्याची 

टिका केली आहे यावरुन तळेकर यांच्या  बुध्दीचा आणखी हवा तेवढा विकास झाला नाही असे दिसुन येते आहे.

इंदापुरला जाणारे उजनीचे पाणी जर रद्द नाही केले तर मी आमदारकीचा तत्काळ राजीनामा देऊन कोर्टाचे दार ठोठावेल असे त्यावेळी आ.बबनदादा शिंदे यांनी सरकारला सांगितले होते व त्याचाच परिणाम म्हणून तत्कालीन जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी ते पाणी रद्द करत असल्याचे शासन आदेशाचे पत्र आ.संजयमामा शिंदे यांच्या मार्फत बबनदादांना पोहोच केले होते हे वास्तव आहे असे असतानाही  बालिश बुद्धीचे प्रवक्ते विनाकारण अकलेचे तारे तोडत आहेत.

           पंढरपूर तालुक्यातील गावे माढा मतदारसंघाला जोडल्यामुळे आ.बबनदादांना दुहेरी भुमिका घ्यावी लागत आहे असा

आरोप तळेकर करतात हे चुकीचे आहे.कारण माढा तालुक्यातील जी ३६ गावे करमाळा तालुक्याला जोडलेली आहेत त्यांना पाणी द्यायला विरोध करणारे नारायण पाटील यांची  भुमिका कोणती होती त्यावेळी हेही जरा लोकांना प्रवक्त्यांनी जगजाहीर सांगितले तर बरे होईल.

         बबनदादांना आ.संजयमामांना धडे देण्याची काहीही गरज नाही कारण आ.संजयमामा शिंदे हे विकासप्रिय नेतृत्व आहे .दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून भरमसाठ पैसा गोळा करून दहिगाव उपसा सिंचन योजना बंद असल्याचा पोरखळ आरोप त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावरती केला आहे. तेव्हा त्या आखुड बुध्दीच्या प्रवक्त्याला एकच सांगायचे आहे की दहिगाव उपसा सिंचन योजना ही १००% पुर्ण क्षमतेने गट-तट न बघता चालवणारे संजयमामा शिंदे आजपर्यंतचे एकमेव आमदार आहेत.

        प्रवक्ते म्हणतात की, दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाणी पातळी पासुनची उंची ही सिना माढा बोगद्यापेक्षा अधिक खोल आहे असे असतानाही दहिगाव उपसा सिंचन योजना पाणी नाही म्हणून बंद पडली आहे वगैरे असे आरोप करणे म्हणजे आपण डोक्यावरती पडलेले आहोत हे सिद्ध करणे आहे.

वास्तविक  सिना माढा बोगद्याची पाणी सोडण्याची खोली ही सर्वात जास्त असुन जेव्हा बोगद्यातून सुटणारे पाणी बंद होते तेव्हा उजनीवर नदी सोडून कोणतीही योजना चालत नाही .मग तिथे दहिगाव उपसा सिंचन योजना कशी चालणार आहे ? याचा जरा त्या प्रवक्त्याने अभ्यास करण्याची गरज आहे ,किंबहुना ती योजना कशी चालू शकते त्यासाठी त्याने त्याच्या नेत्यामार्फत शासनाला किंवा जलसंपदा विभागाच्या मंत्र्यांना काही टिप्स द्याव्यात व योजना चालू करून घ्यावी.

          यावर्षी महाराष्ट्र शासनानेच उजनी धरणातून दरवर्षी देण्यात येणाऱ्या 3 ऐवजी 5 वेळा पाणी नदीला सोडले .त्यामुळे उजनी धरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मायनस पातळीवरती गेले हा वास्तव इतिहास असताना प्रवक्ते मात्र अमुक योजना चालू आहे, तमुक योजना चालू आहे व दहिगाव मात्र बंद आहे असे आरोप करत आहेत .सीना माढा उपसा सिंचन योजना यावर्षी 6 मे रोजी बंद पडली तर दहिगाव उपसा सिंचन योजना 12 मे रोजी बंद पडली .आज रोजी दहीगाव येथील फोरवे मध्ये पाणी येण्यासाठी नदीपात्रामधून जी रचना केलेली आहे ते पात्रच कोरडे आहे असे असताना दहिगाव उपसा सिंचन योजना चालू शकेल का किंवा यापूर्वी नारायण पाटील आमदार असताना अशी योजना चालवली गेली होती का याविषयीची माहिती प्रवक्त्यांनी  जनतेला द्यावी.

उजनीचा एवढा अभ्यास असता तर इंदापुर येथील नियोजित उपसा सिंचन योजनेस आ. शिंदे बंधूंनी विरोध केला असता, असा हल्लाबोल माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला. उजनीचे पाणी धरणग्रस्तांसाठी राखून ठेवा, यासाठी उजनीचे दरवाजे उघडून नदीपात्रात सोडले जाणारे पाणी बंद करा अशी मागणी मा. आ नारायण पाटील यांनी केली. यावर आ. बबनदादा शिंदे यांनी टिका केली. या टिकेस आज पाटील गटाकडून उत्तर दिले. यावेळी बोलताना तळेकर म्हणाले की नदीपात्रात सोडले जाणारे पाणी व यावरील योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात याव्यात आणि उजनी धरणग्रस्तांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली असता या गोष्टीचा एवढा उहापोह करण्याची गरज नव्हती. माजी आमदार नारायण पाटील यांनी या अगोदरही उजनी पाणी परिषदेचे करमाळा तालूक्यात दहा ठिकाणी आयोजन करुन उजनी बाबत गंभीर व अभ्यासात्मक चर्चा घडवून आणली आहे. शेतकर्‍यांना जागृत करुन उजनीच्या हिताचे ठराव या पाणी परिषदेत मंजूर करुन घेतले. या प्रश्नाचा राजकीय स्वार्थासाठी कोण उपयोग करत आहे हे जनतेला ठाउक आहे. माढा मतदार संघाला पंढरपूर मतदार संघातील गावे जोडल्याने आ. बबनदादा शिंदे यांना आज दुहेरी भूमिका घ्यावी लागत आहे.उजनीचा  दांडगा अभ्यास असेल तर याचे थोडे धडे त्यांनी आ. संजयमामा शिंदे यांना द्यावेत. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून पाणी पट्टी व वीज बिल याच्या नावावर भरमसाठ पैसे गोळा करुनही दहिगाव उपसा सिंचन योजना बंद आहे. याचे भान ठेऊन शेतकऱ्याची बाजू घ्यावी. आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे कार्टे असा न्याय जेष्ठ नेते आ. बबनदादा शिंदे करतील असे वाटत नव्हते. दहिगाव उपसाची पाणी पातळी पासूनची उंची हि सीना-माढा बोगद्यापेक्षा अधिक खोल असतानाही दहिगाव उपसा सिंचन योजना पाणी नाही म्हणून बंद पडते. करमाळा तालुक्यातील शेतकरी हे शेतकरी नाहीत का? आ. बबनदादा शिंदे यांनी अगोदर घरातील माणसांना उजनीचे पाठ गिरवण्यास सांगावे. सोलापूर शहराला जाणाऱ्या पाण्याविषयी आपण एवढे गंभीर असता तर आज सर्वाधिक टर्म आमदार राहुनही हा प्रश्न तसाच का राहिला?  इतकी वर्षे मुग गिळून गप्प का बसलात? सन 2014 मध्ये इंदापुरचे आ. दत्तात्रय भरणे व मा आ नारायण पाटील या दोघांनी सोलापूर शहरासाठी बंदीस्त पाईपलाईन द्वारे पाणी पुरवठा करावा, उजनीचे पाणी नदीपात्रात सोडून वाया घालवू नये अशी मागणी सभागृहात तारांकीत प्रश्न मांडून केली होती. यावरुनच आज सोलापूर शहराला बंदिस्त पाईपलाईन मधून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन शासनपातळीवर होत आहे. नारायण पाटील यांची बांधिलकी करमाळा तालूका व मतदार संघास जोडलेल्या माढा तालुक्यातील छत्तीस गावातील नागरिकांशी आहे. उर्वरित माढा तालुक्यातील विकासकामे व कारखानदारीतील शेतकऱ्याची होत असलेली फसवणुक यावर आम्हाला बोलायला भाग पाडू नये. अन्यथा इतक्या वर्षाचे जनसेवेच्या नावाखाली लपलेले स्वार्थी राजकारणाचे भांडे उघडे पडेल.उजनीच्या पाण्याविषयी, माढा तालुक्यातील सीना नदीतील बॅरेज विषयी, बोगदा व उजनी पट्ट्या मधील वीजपुरवठ्या विषयी नारायण पाटील हे आमदार असताना व नसतानाही त्यांनी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलने केली आहेत. दहिगाव उपसा सिंचन योजना नारायण पाटील यांच्यामुळेच कार्यान्वित झाली. यामुळे आ. बबनदादा शिंदे यांनी आ. संजयमामा शिंदे यांची निष्क्रियता झाकण्याचा प्रयत्न करु नये. करमाळा तालूक्याशी जरी आपले काही घेणे देणे नसले तरी कुर्डूवाडी शहर व करमाळा मतदार संघास जोडलेली माढा तालुक्यातील छत्तीस गावे यांच्या विकासाची जाणीव ठेवावी. केवळ बंधूराजांसाठी मते मागण्यापुरता या भागाचा उपयोग करु नये. माढा तालुक्यातील अनेक गावे ही आजही शेतीच्या पाण्यापासून वंचीत आहेत. याचा अभ्यास शिंदे बंधूंनी करावा. वैयक्तिक महत्वकांक्षा, कुटुंबात कारखानदारी बरोबरच राजकीय पदांचे वाटप यात करमाळा-माढा तालुक्यातील विकासाचा गाडा एकाच जागी रुतुन बसला आहे याचे दायित्व स्विकारुन आहे त्या पदावर रहावे की नाही याचा अभ्यास आता आ. शिंदे बंधूनी करावा, असा हल्लाबोल माजी आमदार नारायण पाटील गटाकडून तळेकर यांनी केला.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *