
असंघटित कामगारांना एकत्र करा – मा. आ. नारायण पाटील
करमाळा प्रतिनिधी
असंघटित कामगारांसाठी राज्य शासनाच्या अनेक योजना असून यातीलच एक बांधकाम कामगार नोंदणी उपक्रम महत्त्वाचा असून यात नोंदणी केल्यानंतर कामगारांना 28 प्रकारचे फायदे मिळतात. यामुळे प्रत्येक बांधकाम कामगारांनी यात आपली नोंदणी करून स्वतःचा फायदा करून घ्यावा असे आव्हान माजी आमदार नारायण पाटील यांनी केले.

बांधकाम कामगार नोंदणी कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे युवाजिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना सेना तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, समितीचे माजी सभापती अतुल पाटील, प्रसिद्ध व्यापारी गादिया सेठ, जोशी सेठ, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सेनेच्या उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या तीनशे महिलांची नोंदणी करण्यात आली असून यापैकी दीडशे महिलांना आज नोंदणी कार्ड देण्यात आली.
कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक बाळासाहेब आंधळकर, शारदा भोजन संस्थेचे निलेश मुद्दे, नेहरू युवा केंद्राचे केंद्र समन्वयक अमर कोळेकर, भारतीय मजदूर संघाचे सदस्य निलेश नुलगी या अधिकाऱ्यांनी नोंदणीसाठी मदत केली.

बोलताना महेश चिवटे म्हणाले की, जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यात एक लाख असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची मोहीम सुरू आहे. करमाळा तालुक्यात येत्या तीन महिन्यात दहा हजार कामगारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असून शिवसेनेचे करमाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी या कामासाठी गावोगावी मेळावे घेत आहेत. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या लोकांना कामगार नोंदणी करायची आहे त्यांनी शिवसेनेच्या करमाळा कार्यालयात संपर्क साधावा असे आव्हान महेश चिवटे यांनी केले आहे.