
आरोग्य केंद्रास टाळे ठोकणार – वर्षाताई चव्हाण
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्वात मोठया समजल्या जाणाऱ्या केम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याने गोर-गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. तरी येत्या दहा दिवसात या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक न झाल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने टाळे ठोकण्याचा इशारा महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षां चव्हाण यांनी दिला आहे.

त्या निवेदनात म्हटले आहे की, केम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण १९ गावे जोडली आहेत. तसेच या आरोग्य केंद्रात एकूण चार उपकेंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी यांची मंजूर पदे असून सध्या हि दोन्ही पदे रिक्त आहेत. सध्या या प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय अधिकारी बागडे हे आपल्या माणूसकितून रूग्णांची सेवा करीत आहे त्यांच्या कडे निंभोरे उपकेंद्रे आहे त्याना बाहेर गावाला जावे लागते. अशा वेळेस केम प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या गोर-गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यांना औषध गोळ्या देण्यासाठी सुध्दा कोण नसते त्यांच्या कडे पैसा नसल्याने ते खाजगी दवाखान्यात जाऊ शकत नाही असे रूग्ण अंगावर आजार काढतात. शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून गोर गरीबाची सेवा करण्यासाठी हाॅस्पिटल बांधली आहेत, पंरूतु ग्रामीण भागात डाॅक्टर चार्ज घेत नाहीत अशी या आरोग्य केंद्राची परिस्थिती आहे.

या आरोग्य केंद्रात एकूण सर्व पोस्टची दहा जागा रिक्त आहेत. या जागा शासन कधी भरणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. पुन्हा राज्यात कोराना वाढत आहे. राज्यात हाय अलर्ट लागू केला. आरोग्य मंत्री तर सांगत आहे सर्व यंत्रणा सज्ज आहे. हे फक्त सांगायचे पंरूतु ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पार्श्वभूमी पाहिली तर डॉक्टर नाही मग साथींच्या रोगाला कसा आळा घालणार हि गंभीर परिस्थिती आहे. तरी लवकरात लवकर एम.बी.बी.एस. डाॅक्टरची नेमणूक करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी बोडंवे मॅडम यांच्या कडे विचारणा केली असता केम प्राथमिक आरोग्य केंद्राचा रिपोर्ट डि.एच.ओ. साहेब यांच्या कडे दिला आहे. त्यांच्या कडे चौकशी करा असे त्यांनी उत्तर दिले.