
करमाळा प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर सेवा भजनी मंडळ आयोजित मातोश्री देवी अहिल्याबाई होळकर पालखी सोहळा इंदौर या दिंडीचे आज चौंडी वरून करमाळा येथील मुस्लिम समाजाचे नेते हाजी उस्मानशेठ तांबोळी यांच्या करमाळा औद्योगिक वसाहतीतील प्लॉटवर आगमन झाले. यावेळी माजी नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, युवा नेते अमीरशेठ तांबोळी यांनी या दिंडीचे स्वागत केले.

यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रवीण कटारीया, आदिनाथ कारखानाचे माजी चेअरमन संतोष जाधव पाटील, नगरसेवक नितीन घोलप, माजी नगरसेवक कमलाकर घोलप, नगरसेवक प्रशांत ढाळे, नगरसेवक सचिन अब्दुले, फारुक जमादार, श्री रामचंद्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, नासीर कबीर, अशपाक सय्यद वाजीद शेख, राजु नालबंद, जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ह.भ.प. प्रेमानंद भारती महाराज यांचे किर्तन प्रवचन झाले. यावेळी ते म्हणाले की, तांबोळी परिवाराने गेल्या दोन दशकापासून या इंदूरच्या दिंडीची सेवा करत आहेत. सध्या जाती-जातीमध्ये लोक वाटले जात असताना करमाळात मात्र धर्म जात एक असल्याचे मूर्तिमंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आज राज्याने नव्हे तर देशाने करमाळ्यात येऊन याचा प्रत्यय घ्यावा असे आवाहन ह.भ.प. प्रेमानंद महाराज यांनी यावेळी केले.

यावेळी हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आलेल्या वारकरी संप्रदाय यांचे जोरदार स्वागत करून त्यांची राहण्याची, जेवणाची, आरोग्य सेवा देऊन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सर्व वारकरी दिंडी चालक मालक यांचे स्वागत आहे. यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्वांचे आभार एजाज तांबोळी यांनी मानले.