करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी (SSC) परीक्षेत प्रणीता पृथ्वीराज बिले हिने ९१ टक्के गुण संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल श्री भैरवनाथ प्रतिष्ठान, करमाळा यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले यांच्या हस्ते प्रणीता हिचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव युवराज जयप्रकाश बिले, संचालिका स्वाती युवराज बिले तसेच संस्थेचे बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य जयप्रकाश बिले यांनी प्रणीता हिचे अभिनंदन करताना सांगितले की, सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द, शिस्तबद्ध अभ्यास आणि पालक व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिचे यश प्रेरणादायी असून भविष्यात तिने उच्च शिक्षणाच्या माध्यमातून मोठी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

संस्थेचे सचिव युवराज जयप्रकाश बिले यांनी विद्यार्थ्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, असे प्रतिपादन केले. संचालिका स्वाती युवराज बिले यांनीही प्रणीता हिच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

प्रणीता हिच्या यशामुळे तिच्या कुटुंबासह संस्थेचा आणि करमाळा परिसराचा गौरव वाढला असून उपस्थित शिक्षकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.

शेवटी श्री भैरवनाथ प्रतिष्ठान, करमाळा यांच्या वतीने प्रणीता पृथ्वीराज बिले हिला भावी शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *