
करमाळा प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत करमाळा यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी सुधारणा करण्याबाबत विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार करमाळा यांना दिले होते. त्यावर कार्यवाही करत. सर्व रास्त भाव धान्य दुकानदार यांना तहसिलदार यांनी रेशन वितरणातील त्रुटी लवकरात लवकर दूर करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा संबंधितांविरुद्ध सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) आदेश, २०१५ नुसार कडक कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

त्या आदेशाची प्रत पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार चव्हाण यांनी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, करमाळाचे तालुका सचिव अजिम खान यांना दिली.

यावेळी तालुका सचिव अजिम खान म्हणाले, “रेशन विवरणात अनेका लाभार्थ्यांना सतत रेशन घेताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. परंतू तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांनी सर्व रास्त भाव दुकानदारांना सविस्तर असे आदेश दिले आहेत. यानुसार बदल होईल, ग्राहक लाभार्थ्यांनी सुध्दा सजग राहवे. अन्नधान्य घेतल्यावर पावती मागावी. धान्य घेताना मापे पाहावी व जर कोणी टाळाटाळ केली तर पुरवठा अधिकारी चव्हाण यांना तसेच ग्राहक पंचायतशी संपर्क साधून तक्रार करावी.”

याप्रसंगी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुरच्या सदस्या माधुरी परदेशी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका उपाध्यक्ष चक्रधर पाटील, तालुका सचिव अजिम खान, कार्यकारिणी सदस्य भिमराव कांबळे, आशपाक सय्यद, तालुका सदस्य मंजिरी जोशी, निशिगंधा शेंडे व किशोरी चुंबळकर आदि उपस्थित होते.
