
करमाळा प्रतिनिधी
डिकसळ-कोंढारचिंचोली पुलाचे काम अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन केले जावे जेणेकरून पावसाळ्यात सुद्धा काम चालू राहील अशी मागणी विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती. आज त्यानुसारच काम चालू आहे. जि.प. सदस्य सुभाष गुळवे यांनी श्रेयाचा तराजु हातात घेऊन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पारड्यात माप टाकण्याचा प्रयत्न करु नये. आपले संजयप्रेम इतर ठिकाणी दाखवावे असा हल्लाबोल आमदार नारायण आबा पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केला आहे.

जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुळवे यांनी ढिकसळ पुलाच्या कामाची पाहणी केली व यानंतर लागलीच या कामाचा पाठपुरावा माजी आमदार संजयमामा शिंदे हे करत असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार कामाच्या डिझाईन मध्ये बदल करण्यात आला असल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. यावरुन आता पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी सुभाष गुळवे यांचेवर टिकेची झोड उठवली आहे. या कामाबाबत अधिक सविस्तरपणे माहिती देताना तळेकर यांनी सांगितले की, मुळात सन २०१९ ते सन २०२४ या आपल्या आमदार पदाच्या कार्यकाळात माजी आमदार संजयमामा शिंदे हे डिकसळ पुलाचे काम पुर्णत्वास नेऊ शकले नाहीत. परंतु ज्या ज्या वेळी कोणती निवडणुक आली कि केवळ बॅनरबाजी करुन या रेंगाळलेल्या कामावरच

मतांचा जोगवा मागण्याचे काम केले. तब्बल पाच वर्षात हे काम तडीस न्हेता आले नाही. आता विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी सन २०२४ नंतर आमदार पदाची सुत्रे हाती घेताच रखडलेल्या कामांचा पाठपुरावा केला. यावेळी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना समवेत घेऊन डिकसळ पुलाच्या कामाची पाहणी केली. यातील त्रुटी व दिरंगाईची कारणे जाणून घेतली. त्यावेळी उजनीच्या पाणी पातळीत पावसाळ्यात कमालीची वाढ होत असल्याने सदर ठेकेदाराकडून गेली चार वर्षे काम केले गेले नाही. तर पावसाळा सोडून इतर काळातही पाण्यात बांधकाम करणे अवघड असल्याचे सांगुन या कामास उशीर लावल्याची कारणे अधिकाऱ्यांनी आमदार नारायण आबा पाटील यांना सांगितली. यावरुन अधिक बारकाईने लक्ष दिले असता डिकसळ पुलाच्या कामामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश नसल्याने ठेकेदार कामास उशीर लावतो आहे ही बाब अधोरेखित झाली. यावर

आमदार नारायण आबा पाटील यांनी सदर कामाच्या आराखड्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करावा जेणेकरून पाण्यातही बांधकाम गतीने चालू राहील अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कडे केली. याशिवाय अधिवेशनात सुद्धा हा प्रश्न मांडला. त्यावरुनच आता डिकसळ पुलाच्या कामात बदल झाला असुन यासाठी आमदार नारायण आबा पाटील यांनी केलेला पाठपुरावा उपयोगी पडला आहे. बाकी या कामाची मंजुरी व निधी जरी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात प्राप्त झाल्याचे सुभाष गुळवे सांगत असले तरी पाच वर्षे तत्कालीन आमदार यांनी झोपा

काढल्या का या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. तसेच उजनीतुन माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समवेत जलविहार अथवा नौकानयन करत असताना सुभाष आबांना या कामाची एकदाही आठवण का झाली नाही हे पश्चिम भागातील नागरिक जाणुन आहेत. मध्यंतरी जुना पुल पाणी वाढल्याने खचल्याचे लक्षात येताच आमदार नारायण आबा पाटील यांनी प्रत्यक्षात कार्यस्थळावर जाऊन पाहणी केली होती व त्यानंतर नवीन पुलाचे काम अधिक वेगाने सुरू झाले पाहिजे यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. यामुळे सुभाष आबा गूळवे यांनी श्रेयवादात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या बाजूने युक्तिवाद करु नये. एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने स्वतः काही करता येत असेल तर करावे असा टोलाही प्रवक्ते सूनील तळेकर यांनी लगावला.