करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील मौजे केम येथील केम-टेंभुर्णी जिल्हाप्रमुख मार्ग तथा निवृत्ती महाराज पालखी मार्गावर मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर रस्ता हा अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी सुरू असून सध्या HAM अंतर्गत रस्त्याचे काम सुरू असताना भरत महादेव तळेकर यांनी या रस्त्यावर मोठे दगड टाकून मागील एक महिन्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या प्रकारामुळे एसटी वाहतूक बंद झाली असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

तसेच दिनांक 14 मे 2026 रोजी रात्री केम गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मुख्य पाईपलाईन फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला असून त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

यासंदर्भात तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, भूमि अभिलेख विभाग, केम ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा संपूर्ण केम गाव एक दिवस बंद ठेवण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास केम गावातील ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *